पीटीआय, मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश)
‘भारतीय किसान युनियन’चे (बीकेयू) नेते राकेश टिकैत व त्यांच्या कुटुंबीयांनी शेतकरी आंदोलनापासून दूर न राहिल्यास बॉम्बहल्ला करून ठार मारण्याची धमकी एका अज्ञात व्यक्तीने दिली आहे. ही माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. या प्रकरणी भौरा कलां पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तपास सुरू आहे.
पोलीस ठाण्याचे प्रमुख अक्षय शर्मा यांनी सांगितले, ‘भारतीय किसान युनियन’चे अध्यक्ष व राकेश टिकैत यांचे बंधू नरेश टिकैत यांनी ही तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यात नमूद केले, की जर राकेश टिकैत शेतकरी आंदोलनापासून आपले संबंध तोडणार नसतील तर त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांवर बॉम्ब हल्ला करून त्यांची हत्या करू, अशी धमकी एका अज्ञात व्यक्तीने दूरध्वनीवरून आपल्याला दिली. शर्मा यांनी सांगितले, की या प्रकरणाचा तपास सुरू असून, आम्ही दूरध्वनी करणाऱ्या या अज्ञात व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या वादग्रस्त कृषी कायद्यांविरुद्ध राकेश टिकैत यांच्या नेतृत्वाखील व्यापक व दीर्घकाळ आंदोलन करण्यात आले. त्यानंतर सरकारने हे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला होता.
नव्या आंदोलनाची तयारी
या महिन्याच्या प्रारंभी जयपूरमधील ‘जाट महाकुंभ’मध्ये, राकेश टिकैत यांनी दहा वर्षांपेक्षा जुन्या डिझेल ट्रॅक्टरवरील बंदीविरोधात आंदोलनासाठी सज्ज राहण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले होते. त्यावेळी त्यांनी सांगितले होते, की राज्य किंवा केंद्र सरकार असो, आम्ही कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही. मात्र, चुकीच्या सरकारी धोरणांविरुद्ध आंदोलन केले जाईल.