पीटीआय, नवी दिल्ली
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत अव्वल आलेल्या पाच उमेदवारांमध्ये तीन मुलींचा समावेश असून या चमकदार कामगिरीने यूपीएससी परीक्षेमध्ये नारीशक्ती दिसून आली. या परीक्षेत शक्ती दुबे हिने अव्वल क्रमांक पटकावला आहे. तिने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे, अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया तिचे वडील देवेंद्र दुबे यांनी दिली.
शक्तीचे वडील देवेंद्र दुबे हे उत्तर प्रदेशच्या पोलीस पथकात उपनिरीक्षक आहेत. शक्तीने १२वीपर्यंत एसएमसी घूरपूर येथे शिक्षण घेतले आणि नंतर अलाहाबाद विद्यापीठातून बी.एससी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवला, असे त्यांनी सांगितले. पदवीनंतर तिने बनारस हिंदू विद्यापीठ येथून एम.एससी. केले आणि त्यातही प्रथम क्रमांक पटकावला. आम्ही सुरुवातीला तिला शिकवणीसाठी दिल्लीला पाठवले होते, पण करोना महामारीमुळे तिला घरी परत यावे लागले आणि तिने घरीच अभ्यास सुरू ठेवला, असे त्यांनी सांगितले.
अव्वल पाच
शक्ती दुबे (२८) ही उत्तर प्रदेशमधील नैनी येथील असून तिने अलाहाबाद विद्यापीठातून जैवरसायनशास्त्र विषयात विज्ञानाची (बी.एससी.) पदवी घेतली आहे. तिने बनारस हिंदू विद्यापीठातून विज्ञानातील पदव्युत्तर (एम.एससी.) पदवी पूर्ण केली. तिने यूपीएससीमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे, ‘कर्करोग उपचारासाठी ‘एसआय-आरएनए’च्या सूक्ष्मकण-आधारित औषध पुरवठा प्रणाली’ वर प्रबंध लिहिण्याची आवड आहे.
हर्षिता गोयल (२४) हिने दुसरा क्रमांक पटकावला. हरियाणाच्या हर्षिताने महाराजा सयाजीराव विद्यापीठ, बडोदा येथून वाणिज्य शाखेत पदवी घेतली असून सनदी लेखापाल या विषयामध्ये (सीए) पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तिनेही ‘राज्यशास्त्र व आंतरराष्ट्रीय संबंध’ पर्यायी विषय घेतले होते. ती सध्या गुजरातच्या वडोदरा येथे राहते.
चौथ्या क्रमांकावर आलेल्या मार्गी शाह (वय २६) हिच्याकडे गुजरात टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, अहमदाबाद येथून संगणक अभियांत्रिकीची पदवी आहे. तिने ‘सामाजिक शास्त्र’ हा पर्यायी विषय घेतला होता.
महाराष्ट्राच्या अर्चित डोंगरे (२६) याने तिसरा क्रमांक मिळवला. त्याने वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, तमिळनाडू येथून इलेक्ट्रिकल अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगमध्ये बी.टेक. केले.
दिल्लीच्या आकाश गर्गने (२४) पाचवा क्रमांक पटकावला. त्याने गुरू गोबिंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली येथून संगणक विज्ञानात बी.टेक. पदवी घेतली आहे.
उद्गीरचा कृष्णा पाटील १९७ वा
उद्गीर तालुक्यातील कोदळी येथील कृष्णा बब्रुवान पाटील हा देशात १९७ वा आला आहे. कृष्णा पाटील याचे दहावीपर्यंतचे शिक्षण लालबहादूर शास्त्री विद्यालय उद्गीर येथे झाले. त्याला ९५.३ टक्के गुण होते. बारावीचे शिक्षण राजर्षी शाहू महाविद्यालय लातूर येथे झाले होते. त्याला ७५ टक्के गुण मिळाले होते. त्यानंतर त्याने ‘इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन’ शाखेत पदवी घेतली.