China Attempting to Destabilize Indian Government: तिबेटचे ज्येष्ठ नेते डॉ. लोबसांग सांगे यांनी भारताबाबत एक स्फोटक दावा केला असून, त्यामध्ये त्यांनी म्हटले की, दिल्लीतील चिनी दूतावास भारतीय राजकारण्यांना प्रभावित करण्याचा आणि सत्ता उलथवण्याचा प्रयत्न करत आहे.

“एलिट को-ऑप्शन (सत्तेच्या विरोधात असलेल्या किंवा समाजातील प्रभावशाली लोकांच्या मदतीने कारवाया करणे) ही चीनची जुनी रणनीती आहे. ते राजकीय नेते, बुद्धिजीवी, उद्योजक, पत्रकार आणि आजकाल अगदी युट्यूबर्सनाही विकत घेतात. अशा प्रकारे त्यांनी तिबेट, शिनजियांग आणि मंगोलियामध्ये घुसखोरी केली आहे. आता ते भारतातही तेच करण्याचा प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी एनडीटीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले.

सर्वच विकले गेलेले नसतात, परंतु…

त्यांनी इशारा दिला की भारत चीनच्या डावपेचांपासून सुरक्षित नाही. “दिल्लीतील चिनी दूतावासाच्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभाकडे पहा. कोण कोण उपस्थित राहते ते पाहा. तुम्हाला राजकारणी, व्यावसायिक नेते आणि इतरांचे फोटो दिसतील. यापैकी सर्वच विकले गेलेले नसतात, परंतु चिनी लोक यासाठी प्रयत्न करत राहतात”, असे डॉ. सांगे यांनी नमूद केले.

पाकिस्तान, बांगलादेशचा उल्लेख

डॉ. सांगे यांनी या मुलाखतीत भारताच्या शेजारील देशांमधील परिस्थितीचा उल्लेखही केला, जिथे चीनने कथितपणे त्यांच्या बाजून लवचिक भूमिका घेणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे. “नेपाळमध्ये एक पक्ष उघडपणे चीन समर्थक आहे, तर दुसरा भारत समर्थक आहे. श्रीलंका, बांगलादेश आणि मालदीवमध्ये चीनने सत्ताधारी अभिजात वर्गातील लोक पेरले आहेत. पाकिस्तानमध्ये सर्व प्रमुख राजकीय पक्ष चीनला पाठिंबा देतात”, असे त्यांनी स्पष्ट केले.

अशा प्रकारे चीन लोक खरेदी करतो

डॉ. सांगे यांच्या मते, चीनची ही रणनीती दक्षिण आशियाच्या पलीकडेही विस्तारली आहे. “मी युरोपमध्ये असे काही मंत्री पाहिले आहेत, ज्यांनी चीनचे कौतुक केले, परंतु नंतर त्यांना चिनी कंपन्यांमध्ये १ लाख डॉलर्स किंवा त्याहून अधिक पगाराच्या संचालकपदाच्या नोकऱ्या मिळाल्या. काही प्रकरणांमध्ये वर्षाला ८ लाख डॉलर्सहून अधिक पगाराच्या नोकऱ्याही दिल्या आहेत. अशा प्रकारे चीन प्रभावशाली लोकांना खरेदी करतो”, असे डॉ. सांगे म्हणाले.

सर्वच पक्षांतील नेत्यांना इशारा

डॉ. लोबसांग सांगे यांनी यावेळी सर्वच पक्षांतील भारतीय नेत्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला. “सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष, उद्योजकांनी आणि पत्रकारांनी सावधगिरी बाळगली पाहिजे. जोपर्यंत ते त्यांच्या अजेंडाला मदत करत नाहीत, तोपर्यंत चीन कोणालाही खरेदी करण्यसाठी मागेपुढे पाहत नाही”, असे ते म्हणाले.