पश्चिम बंगालमध्ये सध्या राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून संदेशखालीमधील शाहजहान शेख यांच्या अटकेच्या मागणीसाठी भाजपाने जोरदार निदर्शने केली. तर इंडिया आघाडीला डावलून ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यामुळे काँग्रेसही ममता बॅनर्जी यांच्याविरोधात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळते. भाजपासाठी पश्चिम बंगालमध्ये अधिकाधिक जागा निवडणून आणण्याचे आव्हान आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालच्या कृष्णा नगर येथे एक जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकास्र सोडले. तृणमूल काँग्रेस पक्षाचे इंग्रजीतील छोटे स्वरुप टीएमसी असे आहे. या नावाचा अर्थ सांगताना पंतप्रधान मोदी म्हणाले, तू, मी आणि करप्शन असा आहे.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, “ममता बॅनर्जी यांच्या काळात पश्चिम बंगालची अधोगती झाली. प्रत्येक योजनेत याठिकाणी भ्रष्टाचार दिसतो. केंद्राच्या योजनांनाही टीएमसी सरकार स्वतःचे स्टिकर लावून खपवते. गरीबांचा अधिकार हिरावून घेण्यात या सरकारला काहीच कमीपणा वाटत नाही. अत्याचार आणि छळाचे दुसरे नावच आता टीएमसी असे घेतले जाते. टीएमसीसाठी बंगालचा विकास ही प्राथमिकता नसून भ्रष्टाचार, घराणेशाही आणि छळवाद हेच त्यांचे महत्त्वाचे काम राहिले आहे. बंगालच्या जनतेने गरीब राहावे, असा टीएमसीचा प्रयत्न आहे. जेणेकरून त्यांचा राजकारणाचा खेळ असाच सुरू राहिल.”

संदेशखाली प्रकरणावरून ममता बॅनर्जी लक्ष्य

तृणमूल काँग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेल्या शाहजहान शेख नेत्यावरून भाजपाने टीएमसीवर आरोपांची राळ उठविली. शाहजहान शेखवर लैंगिक अत्याचार आणि जमीन बळकावल्याचे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. शाहजहान शेख ५५ दिवस लपून राहिल्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी त्याला मीनाखान परिसरातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर बशीरहाट न्यायालयाने त्याला १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

पंतप्रधान मोदी यांनी या प्रकरणावरुन तृणमूल काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. ते म्हणाले, बंगालमधील गुन्हेगारांना कधी अटक करायचे, हे बंगालचे पोलीस ठरवू शकत नाहीत, इथे गुन्हेगार ठरवितात की त्यांच्याबरोबर काय होणार. मी संदेशखालीमधील महिलांचे अभिनंदन करू इच्छितो की, त्यांनी न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर येऊन निदर्शने केली. छळ, हिंसाचार आणि अत्याचाराविरोधात त्यांनी आवाज उचलल्यामुळेच शाहजहान शेखची अटक होऊ शकली.