संसदेच्या मागील अधिवेशनात १५० खासदारांच्या निलंबनानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळाला होता. काँग्रेसच्या १५० खासदारांचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निलंबन केलं होतं. या पार्श्वभूमीवर सर्वच विरोधी पक्षांनी त्याचा तीव्र निषेध केला होता. यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांची संसद भवनाबाहेर नक्कल केली होती. त्यावरून मोठा गहजब उडाला होता. आता पुन्हा एकदा कल्याण बॅनर्जी चर्चेत आले आहेत. यावेळी जगदीप धनखर यांच्याऐवजी लोकसभेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याशी कल्याण बॅनर्जी यांचा संवाद चालू होता.

नेमकं काय घडलं?

लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा चालू आहे. यावेळी विरोधी बाकांवरून तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी हे दुपारी १२ च्या सुमारास भाषणासाठी उभे राहिले. आपल्या भाषणात त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, खोचक शब्दांमध्ये टोलेबाजीही केली. मात्र, यावेळी त्यांनी केलेल्या एका उल्लेखाची व्हिडीओ क्लिप सध्या तुफान व्हायरल होत आहे. एनडीए आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेल्या अब की बार ४०० पार च्या घोषणेची खिल्ली उडवताना कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याबाबतही मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात एकच हशा पिकला!

काय म्हणाले कल्याण बॅनर्जी?

कल्याण बॅनर्जी यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘अब की बार, ४०० पार’ घोषणेचा उल्लेख केला. यावेळी त्यांनी लहान मुलं खेळत असलेल्या एका खेळाचाही उल्लेख करत त्याचं उदाहरण भाजपाच्या या घोषणेला आणि त्यानंतर लागलेल्या लोकसभा निकालांना दिलं. “त्यांनी निवडणुकीच्या वेळी अबकी बार चारसौ पार अशी घोषणा दिली होती. खेळ सुरू झाला होता. ‘चु कित कित’ (महाराष्ट्रात याला ठिकरीचा खेळ असंही म्हणतात) हापण एक खेळच आहे. आधी ४०० पार म्हणत हे पळाले. पण कित कित कित कित करत शेवटी किती झाले? २४० झाले. त्या खेळातही हरले”, असं कल्याण बॅनर्जी यांनी म्हणताच सभागृहात पुन्हा एकदा हशा पिकला.

काय आहे हा खेळ?

पश्चिम बंगालमध्ये या खेळाला ‘चु-कित-कित’ म्हटलं जातं, तर इंग्रजीत या खेळाला Hoopscotch म्हटलं जातं. या खेळात जमिनीवर काही विशिष्ट पद्धतीने व क्रमाने चौकोन आखून त्यात लंगडी घालत दगड टाकून हा खेळ खेळला जातो. महाराष्ट्रात प्रामुख्याने ग्रामीण भागात हा खेळ ‘ठिकरीचा खेळ’ म्हणून खेळला जातो. वेगवेगळ्या भागात या खेळाला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं. पण त्याच खेळाची उपमा देऊन कल्याण बॅनर्जींनी मोदींना व पर्यायाने भारतीय जनता पक्ष व एनडीएला लक्ष्य केलं आहे.

ओम बिर्लांना म्हणाले, “मी तुमच्याकडेच बघतोय”

दरम्यान, कल्याण बॅनर्जींनी सत्ताधारी बाकांवरील खासदारांकडे बघून बोलायला सुरुवात करताच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी बॅनर्जी यांना प्रथेप्रमाणे त्यांच्याकडे अर्थात अध्यक्षांकडे बघून बोलायला सांगितलं. त्यावेळी कल्याण बॅनर्जींनी पुन्हा मिश्किल टिप्पणी करताच सभागृहातील सर्वच खासदारांनी त्यांना हसून दाद दिली.

VIDEO : तृणमूलच्या खासदाराने धनखडांची खिल्ली उडवताना राहुल गांधींनी केलं चित्रीकरण; सभापती संतप्त होत म्हणाले…

“मी तर तुम्हालाच बघतोय. मी इतर कुणालाही बघत नाहीये. एका बाजूने मी तुम्हालाच बघतोय. तुमच्यापेक्षा स्मार्ट इथे कुणीच नाही. त्यामुळे आम्ही त्यांना सोडून तुम्हालाच बघणार. इथे चांगल्या अभिनेत्रीही आल्या आहेत. पण आम्ही त्यांना सोडून तुम्हालाच बघतो आम्ही. फक्त तुम्हाला बघतो. तुम्हीच तुम्ही इथे व्यापून उरला आहात”, अशी मिश्किल टिप्पणी कल्याण बॅनर्जी यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मोदींच्या गॅरंटीमध्ये वॉरंटी नाही”

“मन की बात असो किंवा दिल की बात असो. तुम्ही तुमची आश्वासनं पूर्ण करू शकत नाही. मोदींच्या गॅरंटीमध्ये वॉरंटी नाहीये सर”, असंही ते म्हणाले.