देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते आयसीएमआर आणि इतर केंद्रीय आरोग्य प्रशासनाकडून देखील सातत्याने देशवासीयांना संभाव्य रुग्णवाढीसंदर्भात सूचना दिल्या जात आहेत. लोकांकडून सातत्याने केलं जाणारं करोना नियमांचं उल्लंघन, मास्क वापरण्याकडे केलं जाणारं दुर्लक्ष आणि लोकांमध्ये आलेला निर्धास्तपणा या पार्श्वभूमीवर देशातील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. गेल्या २ दिवसांपासून ४० हजारांच्या आत असलेली नव्या बाधितांची संख्या गेल्या २४ तासांत पुन्हा ४० हजारांच्या वर गेली आहे. देशभरात नव्या आकडेवारीनुसार ४१ हजार १५७ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यासोबतच गेल्या २४ तासांत देशात तब्बल ५१८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

 

एकीकडे नवे करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांमुळे चिंता वाढली असली, तरी करोनावर मात करणाऱ्या रुग्णांच्या आकडेवारीमुळे आरोग्य प्रशासनाला काहीसा दिलासा मिळाला आहे. देशात गेल्यात २४ तासांमध्ये एकूण ४२ हजार ००४ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी पाठवण्यात आले आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनातून बरे झालेल्या रुग्णांचा आकडा ३ कोटी २ लाख ६९ हजार ७९६ इतका झाला आहे.

दिवसभरात ५१८ मृत्यू

एकीकडे नव्या करोनाबाधितांची संख्या वाढलेली असताना गेल्या २४ तासांमध्ये ५१८ मृतांची नोंद करण्यात आली आहे. शनिवारी हाच आकडा ५६० इतका नोंदवण्यात आला होता. त्यामुळे मृतांच्या आकड्यात काहीशी घट पाहायला मिळते आहेत. आजच्या आकडेवारीनुसार आत्तापर्यंत भारतात एकूण ४ लाख १३ हजार ६०९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

देशातील एकूण करोना बाधितांची संख्या जरी जास्त दिसत असली, तरी त्यापैकी आजघडीला फक्त ४ लाख २२ हजार ६६० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशभरात होम आयसोलेशन किंवा इन्स्टिट्युशनल आयसोलेशनमध्ये लक्षणं नसलेले बाधित असून लक्षणं असलेले किंवा परिस्थिती खालावलेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.