रेल्वे प्रोटेक्शन फोर्सने (आरपीएफ) रेल्वेच्या ऑनलाइन तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या रॅकेटची पाळमुळं पाकिस्तान, बांगलादेश आणि दुबईपर्यंत पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे. तिकिटांमध्ये घोटाळे करीत त्यातून कमावलेल्या करोडो रुपयांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी होत असल्याची बाबही समोर आली आहे. या प्रकरणी आरपीएफने २७ लोकांना अटक केली असून त्यांची आयबी (गुप्तचर यंत्रणा) आणि एनआयए (राष्ट्रीय तपास पथक) देखील चौकशी करीत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आरपीएफच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या प्रकरणी गुलाम मुस्तफा नामक एका व्यक्तीला ओडिशातील भुवनेश्वर येथून अटक करण्यात आली असून सोमवारी त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. त्याचबरोबर या काळ्या बाजारात सहभागी असलेल्या इतर २७ जणांनाही आरपीएफने अटक केली आहे.

रेल्वेच्या तिकिटांच्या काळाबाजारासाठी या टोळीने एक सॉफ्टवेअर विकसित केले असून याद्वारे हे लोक केवळ १.४८ मिनिटांत ३ तिकीट बुक करीत होते. शेकडो आयडींच्यामार्फत हा खेळ सुरु होता. यावरुन काही मिनिटांत ही टोळी हजारो तिकिटांचा काळाबाजार करीत असल्याचे लक्षात येते. साधारणपणे एका तिकीटाच्या बुकिंगसाठी तीन मिनिटांपर्यंत वेळ लागू शकतो. दरम्यान, या रॅकेटच्या तिकिटांच्या काळाबाजारामुळे काही गरजवंतांना तिकिट उपलब्ध होऊ शकत नव्हते. आरपीएफच्या माहितीनुसार, बऱ्याचदा या टोळीतील एकच व्यक्ती ८० टक्के तिकिटांचे बुकिंग करीत असे. या तिकिटांनंतर मनमानी किंमतीत प्रवाशांना विकले जात होते. यामुळे रेल्वेच्या कमाईवर कोणताही परिणाम होत नसला तरी सर्वसामान्य प्रवाशांकडून मात्र यासाठी अधिक पैसे उकळले जात होते.

आरपीएफचे महासंचालक अरुण कुमार यांनी सांगितले की, मुस्तफा याच्याकडून दोन लॅपटॉप जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये ‘एएनएमएस’ नावाचे एक सॉफ्टवेअर आहे. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या रॅकेटचा काळाबाजार सुरु होता. विशेष म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपिंगचे कुठलेही प्रशिक्षण न घेतलेल्या या मुस्तफाने स्वतः हे सॉफ्टवेअर डेव्हलप केले होते.

विना’ओटीपी’ आणि ‘कॅप्चा’ कोडद्वारे होत होते बुकींग

या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून या टोळीने आयआरसीटीसीवरुन तिकिटांचा काळाबाजार करण्यासाठी सर्व अडथळ्यांवर पर्याय काढला होता. ओटीपी क्रमांक आणि कॅप्चा कोडशिवाय हे लोक तिकिटांची बुकिंग करीत होते. या घोटाळ्याच्या माध्यमातून ते महिन्याला १० ते १५ कोटी रुपये कमावत होते. या टोळीचा पहिला हेतू रोकड कमावणे हाच होता.

पैशाचा वापर दहशतवादी कारवायांसाठी

रोकड मिळवल्यानंतर हे लोक या पैशांचा वापर दहशतवादी कारवायांसाठी करीत होते. अटक करण्यात आलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या काळ्याबाजाराची मुळं टेरर फंडिंग आणि आर्थिक घोटाळ्यांशी जोडलेली आहेत. इतकेच नव्हे मुस्तफाच्या लॅफटॉपमध्ये पोलिसांना एक असे अॅप्लिकेशन मिळाले आहे, ज्याद्वारे बनावट आधार कार्ड तयार केले जातात.

टोळीचा म्होरक्या दुबईतून चालवतोय रॅकेट

या टोळीचा म्होरक्या उत्तर प्रदेशातल्या बस्ती जिल्ह्यातील हामिद अशरफ असल्याचे आरपीएफचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी गोंडा जिल्ह्यात झालेल्या बॉम्बस्फोटातील तो आरोपी असून फरार आहे. अटकेच्या भीतीने तो नेपाळमार्गे दुबईला पळून गेला आहे. सध्या तो तिकडून हे रॅकेट चालवत असल्याचे आरपीएफने सांगितले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Train e ticket black market money being used directly for terrorist activities aau
First published on: 22-01-2020 at 10:24 IST