केरळच्या कोझिकोडे शहरात २ एप्रिल रोजी केलेल्या ट्रेन जाळपोळ प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहरुख सैफीचा फोटो काढणाऱ्या मातृभूमी वृत्तवाहिनीच्या पथकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या वृत्तवाहिनीच्या पथकाने शाहरुख सैफीला महाराष्ट्रातून ज्या वाहनाद्वारे केरळला नेलं जात होतं, त्या वाहनाचा पाठलाग केला होता.
पोलिसांनी त्यांच्या एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, ५ एप्रिलच्या रात्री ते शाहरुख सैफीला महाराष्ट्रातील रत्नागिरीहून कोझिकोडेला घेऊन येत होते. तेव्हा या वृत्तवाहिनीच्या पथकाने पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग केला. तसेच कर्नाटकमधील भटकळ आणि उडुपी दरम्यान पोलिसांचं वाहन अडवलं. तसेच त्यांनी आरोपीचे फोटो काढले. हे पथक एवढ्यावरच थांबलं नाही तर त्यांनी आरोपी शाहरुख सैफीला घेऊन येणाऱ्या पोलिसांचे फोटो काढले. पोलिसांनी तिथून निघण्याचा प्रयत्न केल्यावर चार जणांच्या टीमने एका एसयूव्हीमधून पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला.
पोलीस उपअधीक्षक अब्दुल रहीम यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर ३० एप्रिल रोजी या वृत्तवाहिनीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. यामध्ये संबंधित वृत्तवाहिनीचे पत्रकार अधवा कुठल्याही व्यक्तीचं नाव नमूद केलेलं नसलं तरी ज्या वाहनाद्वारे पाठलाग केला त्या वाहनाचा क्रमांक आणि वृत्तवाहिनीचं नाव नमूद करण्यात आलं आहे.
पोलिसांनी वृत्तवाहिनीच्या पथकातील तीन जणांचे मोबाईल जप्त केले आहेत, जेणेकरून पोलीस पुढील तपास करू शकतील, तसेच पाठलाग करण्यासाठी वापरलेलं वाहनही ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला.
हे ही वाचा >> “घरात नाही दाणा आणि मला…”, सिद्धरामय्यांच्या शपथविधी सोहळ्याच्या निमंत्रणावरून शिंदे गटाची आदित्य-उद्धव ठाकरेंवर टीका
दरम्यान, वृत्तवाहिनीतील सुत्रांनी दावा केला आहे की, आमच्या पत्रकारांना पोलिसांनी खोट्या प्रकरणात अडकवलं आहे. आम्ही हे प्रकरण न्यायालयात कायदेशीर पद्धतीने लढू. पोलिसांनी आमच्या पत्रकारांना नोटीस बजावल्यानंतर ते तपास अधिकाऱ्यांसमोर हजर झाले आहेत. आमच्या टीममधील सहकाऱ्यांचे जप्त करण्यात आलेले मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी आम्ही पोलीस महासंचालकांना पत्र पाठवलं आहे. पोलिसांचं हे कृत्य माध्यमांच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहे.