अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने जाता जाता चीनला पुन्हा एक दणका दिलाय. ट्रम्प यांच्या प्रशासनाने चीनने उइगर मुस्लीमांचा नरसंहार केला आणि हा मानवतेविरोधात केलेला गुन्हा असल्याच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत असं म्हटलं आहे. अमेरिकेचे सेक्रेट्री ऑफ स्टेट असणाऱ्या माईक पॅम्पो यांनी चीनमधील शिनजियांगच्या पश्चिमेला राहणाऱ्या उझगर मुस्लिमांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात ट्रम्प प्रश्नासनाची भूमिका शेवटपर्यंत जैसे थेच आहे असं स्पष्ट केलं. अमेरिकेच्या या वक्तव्यामुळे बिजिंगला ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या शेवटच्या दिवशीही मोठा झटका सहन करावा लागल्याचे आंतरराष्ट्रीय राजकारणाचे जणकार सांगतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

झिनजियांगमधील स्वतःचे (चीनचे) धोरण, पद्धती आणि गैरवर्तवणुकीसंदर्भाती विस्तृत माहिती देणारे कागदपत्रांच्या आधारे पोम्पिओ यांनी चीनमध्ये उइगर मुस्लींवर होत असणारा हिंसाचार हा किमान मार्च २०१७ पासून सुरु असल्याचं म्हटलं आहे. पत्रकारांशी यासंदर्भात संवाद साधताना पोम्पिओ यांनी ही माहिती दिल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात नमूद केलं आहे.

नक्की वाचा >> ट्रम्प यांनी शेवटच्या भाषणात बायडेन यांचा उल्लेख टाळला, पण जाता जाता दिला सूचक इशारा

पॅम्पो काय म्हणाले?

“सर्व उपलब्ध माहितींची पडताळी केल्यानंतर मला खात्री आहे की चीनने कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली शिनजियांगच्या पश्चिमेला राहणाऱ्या उझगर मुस्लिमांबरोबरच अल्पसंख्यांकांचा नरसंहार केला आहे,” असं पोम्पिओ यांनी म्हटलं आहे. “माझ्यामते अजूनही हा नरसंहार सुरु असून या माध्यमातून उइगर मुस्लिमांना चीनमधून कायमचं संपवण्याचा चीनचा विचार आहे,” असंही पोम्पिओ यांनी नमूद केलं आहे.

दोन आर्थिक महासत्तांमधील वाद

ट्रम्प प्रशासनाच्या या भूमिकेमुळे जगातील दोन आर्थिक महासत्ता असणाऱ्या देशांमधील संबंध आणखीन ताणले जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी करोनाचा फैलाव झाल्यानंतर अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर अनेक आरोप केले होते. त्यानंतर २०२० च्या उत्तरार्धामध्ये चीन आणि अमेरिकेचे संबंध मागील काही दशकांमधील सर्वाधिक बिघडलेले होते.

अनेकदा झालीय चीनवर टीका

शिनजियांगमध्ये सुरु असणाऱ्या सरकार पुरस्कृत हिंसेवरुन अनेकदा चीनवर जागतिक स्तरावर टीका झाली आहे. मात्र चीनने कायमच येथे चालवण्यात येणारे कार्यक्रम हे व्होकेशन ट्रेनिंग सेंटर्स म्हणजेच प्रशिक्षण शिबिरं असल्याचा दावा केला आहे. स्थानिकांना नवीन कला आणि कौशल्य शिकवले जात असल्याचा दावा चीनने केलाय. मात्र अनेक देशांनी या छावण्यांमध्ये उइगर मुस्लिमांवर अत्याचार केले जात असल्याचा आरोप केलाय.

अमेरिकेच्या या भूमिकेचा काय होणार परिणाम?

अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही आपल्या निवडणूक प्रचारामध्ये चीनमधील शिनजियांगमध्ये नरसंहार होत असल्याचा उल्लेख केलाय. ट्रम्प प्रशासनाने शेवटच्या दिवशी केलेल्या या घोषणेमुळे चीनला थेट काही आर्थिक फटका बसणार नाही. मात्र यामुळे इतर देशांनी शिनजियांगमध्ये उद्योग स्थापन करताना विचार करण्याची गरज असल्याचे संकेत यामधून अमेरिकेने दिले आहेत. या प्रांतामध्ये कापसाची मोठ्या प्रमाणात शेती होत असल्याने जागतिक स्तरावरील अनेक कंपन्या खास करुन कापड निर्मिती क्षेत्रातील कंपन्यांचे या प्रांताशी आर्थिक हितसंबंध जोडलेले आहेत. मागील आठवड्यातच अमेरिकेने शिनजियांगमध्ये उत्पादन घेतले जाणाऱ्या कापसाच्या आणि टोमॅटोच्या आयातीवर निर्बंध आणलेत.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trump administration declares china repression of uighurs genocide scsg
First published on: 20-01-2021 at 08:36 IST