अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात शुल्काची घोषणा केली. विरोधकांकडून टीका होऊ लागल्यानंतर राष्ट्रहित जपण्यासाठी सर्व पावले उचलली जातील, असे वाणिज्य व उद्याोगमंत्री पीयूष गोयल यांनी स्पष्ट केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांत त्यांनी निवेदन केले.

‘अमेरिकेच्या निर्णयानंतर त्याबाबत होणाऱ्या परिणामांचा केंद्र सरकार अभ्यास करत आहे. निर्यातदार व अन्य संबंधितांशी सरकार चर्चा करत असून, परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे’, असे गोयल यांनी नमूद केले.

अमेरिकेला कृषी आणि दुग्ध क्षेत्रात आयात शुल्कामध्ये सवलत देण्याबाबत भारताने कठोर भूमिका घेतली असल्याने गोयल यांच्या विधानाला महत्त्व आहे. चर्चेदरम्यान अमेरिकेने याबाबत आग्रह धरला होता. दुग्ध क्षेत्र हे यापूर्वीच्या व्यापार करारांमध्ये खुले केलेले नाही. तर कृषी क्षेत्र हे राजकीयदृष्ट्या संवेदनशील मानले जाते. ग्रामीण भागातील ७० कोटी नागरिकांचे जीवनमान यावर अवलंबून आहे. शुल्क कमी केल्यास राष्ट्रीय अन्न सुरक्षेबाबत धोका निर्माण होण्याची चिंता आहे.

अमेरिकेचे पथक २५ ऑगस्टला भारतात

मार्चपासून भारत-अमेरिका यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर चर्चा सुरू आहे. द्विपक्षीय व्यापार २०३० पर्यंत ५०० अब्ज डॉलर करण्याचे उद्दिष्ट असून सध्या तो १९१ अब्ज डॉलर इतका आहे. आतापर्यंत चर्चेच्या पाच फेऱ्या झाल्या असून, सहाव्या फेरीसाठी अमेरिकेचे पथक भारतात २५ ऑगस्ट रोजी येईल. पहिल्या टप्प्यातील करार ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत करण्याचा प्रयत्न आहे. चेंडू अमेरिकेच्या कोर्टात आहे, काय होते ते पाहू, असे सूत्राने नमूद केले.

मोदी मौन सोडतील का? – खरगे

भारत-पाकिस्तान यांच्यात शस्त्रसंधी घडवून आणल्याच्या ट्रम्प यांच्या दाव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ‘मौन व्रत’ साजरे केले. अमेरिकी नेत्याने भारतावर केलेल्या निराधार आरोपांवर ते गप्प का बसले आहेत, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी विचारला. राष्ट्र प्रथम येते आणि आम्ही नेहमीच राष्ट्राबरोबर आहोत, असे खरगे यांनी ठामपणे सांगितले. ‘नमस्ते ट्रम्प’ करूनही तुमच्या मित्राने मैत्रीचे प्रतिफळ अशा प्रकारे आपल्या देशाला दिले आहे, असे खरगे म्हणाले.

भारतीय अर्थव्यवस्था मृतावत झाल्याच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांना दुजोरा देऊन राहुल गांधी यांनी खालची पातळी गाठली. हा देशाचा अपमान आहे. प्रामाणिकपणे सांगायचे तर राहुल गांधी यांची राजकीय विश्वासार्हता संपलेली आहे. – अमित मालवीय, भाजप नेते

दोघांनाही मोदी पूर्णपणे समजले – रमेश

पंतप्रधान मोदींनी अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांच्या वैयक्तिक मैत्रीत खूप मोठी गुंतवणूक केली. पूर्वी चिनी अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याशीही अशीच मैत्री केली. आता दोघांनाही हा माणूस पूर्णपणे समजला असेल. ज्याला त्याच्या प्रचंड अहंकार आणि स्वार्थापोटी खेळून सहजपणे नियंत्रित केले जाऊ शकते, असे टीकास्त्र काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सोडले.

डोनाल्ड ट्रम्प यांचे अज्ञान – चतुर्वेदी

भारतीय अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आहे आणि तिला ‘मृत अर्थव्यवस्था’ म्हणणे यातून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अहंकार किंवा अज्ञान दिसून येते, अशी टीका शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. त्यांनी अमेरिकी अध्यक्षांवर जोरदार हल्लाबोल केला.