वृत्तसंस्था, वॉशिंग्टन

अमेरिकी कॅपिटॉलवरील २०२१च्या हल्ल्यातील सहभागामुळे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा निर्णय कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी दिला. कोलोरॅडो राज्याच्या रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक अध्यक्षीय मतपत्रिकेतून ट्रम्प यांचे नाव वगळण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

ट्रम्प यांना घटनेच्या १४ व्या घटनादुरुस्तीनुसार अपात्र ठरवण्यात आले आहे.  राज्यघटनेची शपथ घेणारा नेता बंडखोरीसारख्या प्रकारांत सामील असेल तर त्याला  महत्त्वाच्या पदाची निवडणूक लढवण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी तरतूद घटनेत आहे. त्यानुसार ट्रम्प यांना  अपात्र ठरवण्यात आले. आहे. ट्रम्प ६ जानेवारी २०२१च्या बंडात सामील होते हा कनिष्ठ न्यायाधीशांचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला. मात्र अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी घटनेतील तरतूद लागू होत नाही, हा निष्कर्ष रद्दबातल ठरवला. अमेरिकी कॅपिटॉलवर ६ जानेवारी २०२१ रोजी झालेल्या हल्ल्यावरून ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याचा कोलोरॅडो सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल ऐतिहासिक आहे, असे ‘सीबीएस न्यूज’च्या वृत्तात म्हटले.

हेही वाचा >>>“सतर्क राहा, घाबरू नका”, कोविडच्या नव्या व्हेरिएंटनंतर केंद्राचे राज्यांना निर्देश

कारण काय?

 २०२१च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभव झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी अमेरिकी कॅपिटॉलवर हल्ला केला होता. हल्लेखोरांना ट्रम्प यांनी चिथावणी दिली होती. या कारणावरून कोलोरॅडो न्यायालयाने त्यांना अपात्र ठरवले आहे.