तुलसी प्रजापती बनावट चकमकप्रकरणी भाजपचे  राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर, भूपेन्द्र यादव आणि पक्षाचे सरचिटणीस रामलाल यांना केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता आहे.
तुलसी प्रजापतीची आई नर्मदाबाई यांच्याशी संपर्क साधून त्यांनी आपला ‘वकालतनामा’ बदलण्यासंबंधी कशा प्रकारे त्यांचे मन वळवावे, याबद्दल हे तिघेजण चर्चा करीत असल्याचे एका ‘स्टिंग ऑपरेशन’ वरून स्पष्ट झाल्याने त्यांना चौकशीसाठी पाचारण करण्याचा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. बनावट चकमकीत आपला मुलगा तुलसी प्रजापती ठार झाल्याची तक्रार नर्मदाबाई यांनी केली होती. दरम्यान, या तिघांनी संबंधित आरोप फेटाळून लावला. तर कथित सीडीसंबंधी सर्व प्रश्नांना उत्तरे देण्यास तयार असल्याचे जावडेकर यांनी स्पष्ट केले.