भारतीयांनाही लवकरच ट्विटरवर ‘ब्ल्यू टिक’साठी पैसे भरावे लागणार आहेत. ‘ट्विटर’चे नवे मालक एलॉन मस्क यांनी एका महिन्यात भारतात ही सेवा सुरु होईल असं स्पष्ट केलं आहे. एका भारतीय युजरने मस्क यांच्याकडे यासंबंधी शंका उपस्थित केल्यानंतर, त्यांनीच याचं उत्तर दिलं. नुकतंच मस्क यांनी ट्विटवरील ‘ब्ल्यू टिक’साठी ८ डॉलर भरावे लागणार असल्याचं जाहीर केलं असून, काही ठिकाणी याची अंमलबजावणी सुरु केली आहे.

सध्या ‘ट्विटर ब्ल्यू’ सेवा अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमध्ये सुरु करण्यात आली आहे. भारतातही महिन्याभरात ही सेवा सुरु होईल असं मस्क यांनी स्पष्ट केलं आहे.

“काही पर्यायच उरला नव्हता”, ट्विटरमधील ५० टक्के कर्मचारी कपातीवर एलॉन मस्क यांचं स्पष्टीकरण!

ट्विटरवर प्रभू नावाच्या युजरने ‘ट्विटर ब्ल्यू’ भारतात कधी सुरु होणं अपेक्षित आहे? अशी विचारणा केली. यावर उत्तर देताना मस्क यांनी, महिनाभराच्या आत सुरु होईल अशी आशा असल्याचं सांगितलं.

दरम्यान, आयफोनमधील ट्विटर अॅपवर एक नोटिफिकेशन दिसत आहे. यामध्ये आम्ही आजपासून ‘ट्विटर ब्ल्यू’मध्ये नवे फिचर समविष्ट करत असून, लवकरच आणखी नवे फिचर्स दाखल होतील. आता साइन अप केल्यानंतर महिन्याला ८ डॉलर भरत ट्विटर ब्ल्यू मिळवा, असं सांगण्यात आलं आहे.

सेलिब्रिटी, कंपन्या आणि राजकारणी ज्यांना तुम्ही फॉलो करत त्यांच्याप्रमाणे तुम्हीही तुमच्या अकाऊंटला ‘ब्ल्यू चेकमार्क’ मिळवा असंही ट्विटरने म्हटलं आहे. ट्विटरने व्हेरिफाय असलेल्या अकाऊंटसाठी येणाऱ्या नव्या फिचर्सची माहितीही दिली आहे.

ट्विटरने ब्ल्यू टिकसाठी पैसे आकारण्यास सुरुवात केल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. अनेकांनी या निर्णयाचा विरोध केला असून, काहींना पाठिंबा दर्शवला आहे. अनेक लेखक, पत्रकार ट्विटरच्या माध्यमातून चांगली माहिती देत असून त्यांना पैसे आकारणं अयोग्य असल्याचं काही युजर्सचं म्हणणं आहे. तर काही युजर्सनी नवी व्हेरिफिकेशन सिस्टम अनेक नवे फिचर्स देत असल्याचं सांगत पाठिंबा दर्शवला आहे.