पीटीआय, कोलकाता
पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे वैद्यकीय शाखेच्या एका २३ वर्षीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणी सोमवारी आणखी दोघांना अटक करण्यात आली. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाच झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, या प्रकरणात पुरावे नष्ट करण्यात येत आहेत आणि संशयितांना केलेली अटक ही धूळफेक आहे, असा आरोप भाजप नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी केला.
आसनसोल-दुर्गापूरचे पोलीस उपायुक्त अभिषेक गुप्ता यांनी सांगितले की, पीडित मुलीने दाखल केलेल्या तक्रारीवरून या सर्व पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी ओदिशाच्या बालेश्वर जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि ती दुर्गापूरमधील एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयात दुसऱ्या वर्गात शिकते. ती शुक्रवारी रात्री तिच्या मित्राबरोबर जेवणासाठी महाविद्यालयाच्या कॅम्पसबाहेर गेली असता, सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार तिने नोंदवली. पोलिसांनी तिच्या मित्रालाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याच्या हालचालींबद्दल संशय असल्याचे पोलिसांनी सांगितले.
दरम्यान, विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्यासह काही भाजप नेते डॉक्टरांना भेटायला गेले होते, मात्र त्यांना अडवण्यात आले. याप्रकरणी पाच संशयितांना करण्यात आलेली अटक निव्वळ धूळफेक असून सर्व संशयितांना १५-२० दिवसांनी जामीन मिळेल, असा दावा अधिकारी यांनी केला. यापैकी एक संशयित हा तृणमूल काँग्रेसशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला. मात्र, तृणमूल काँग्रेसने हा आरोप फेटाळताना राज्यातील प्रत्येक दुसरी व्यक्ती आमच्या पक्षाशी संबंधित असल्याचे सांगितले. दुसरीकडे, या प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे, असे मत राज्यपाल सी. व्ही. आनंद बोस यांनी व्यक्त केले.
अपराजिता विधेयकावरून वाद
दुर्गापूर बलात्कार प्रकरणावरून सत्ताधारी तृणमूल काँग्रेसची कोंडी करण्याचा भाजप प्रयत्न करत असताना, तृणमूल काँग्रेसने अपराजिता विधेयकाचा मुद्दा उपस्थित केला आहे. अपराजिता विधेयकामध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांसाठी अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, केंद्रातील मोदी सरकार हे विधेयक मंजूर होऊ देत नसल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला.
मुलीच्या पालकांना तिचे वैद्यकीय अहवाल देण्यात आलेले नाहीत. पालकांनाही रुग्णालयात तिला भेटण्याची परवानगी नाही. हा गुन्ह्यासंबंधी पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. – सुवेंदू अधिकारी, नेते, भाजप