Murder To Steal iPhone: उत्तर प्रदेशातील बहराइच जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली आहे. सोशल मीडियावर “हाय क्वालिटी रील्स” बनवण्यासाठी दोन अल्पवयीन मुलांनी १९ वर्षीय तरुणाचा आयफोन चोरण्यासाठी खून केल्याचा आरोप आहे. दोन्ही अल्पवयीन मुलांनी पीडित तरुणाचा गळा चिरला आणि नंतर त्याचे डोके दगडाने ठेचले, असा आरोप आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे, असे पीटीआयने पोलीस अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

बेंगळुरू येथे राहणारा पीडित शादाब (१९) हा त्याच्या मामाच्या लग्नासाठी बहराइचमधील नागौर येथील त्याच्या मूळ गावी आला होता. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रामानंद प्रसाद कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हत्या २० जूनच्या रात्री झाली आहे.

“२१ जून रोजी शादाब बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्याच दिवशी गावाबाहेरील पेरू बागेत असलेल्या विहिरीजवळ त्याचा मृतदेह आढळला होता. शादाबचा गळा चाकूने चिरण्यात आला होता आणि त्याच्या डोक्यावर विटेने वार करण्यात आले होते,” असे एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले.

दरम्यान, तपासाच्या आधारे पोलिसांनी शनिवारी १४ आणि १६ वर्षांच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

“चौकशी दरम्यान दोन्ही अल्पवयीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांनी सांगितले की त्यांना चांगल्या रील्ससाठी उच्च दर्जाचा मोबाईल फोन हवा होता. त्यांनी चार दिवसांपूर्वीच हत्येची योजना आखल्याचे कबूल केले आहे,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

या पोलीस अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, “घटनेच्या रात्री आरोपींनी शादाबला रील बनवण्याच्या बहाण्याने गावाबाहेरील एका निर्जन भागात नेले. तिथे त्यांनी त्याच्यावर हल्ला केला, त्याचा गळा कापला आणि नंतर त्याचे डोके विटेने ठेचले.”

दरम्यान, पोलिसांनी शादाबचा आयफोन, हत्येत वापरलेला चाकू आणि वीट जप्त केली आहे. याचबरोबर दोन्ही अल्पवयीन आरोपींसह त्यांच्या कुटुंबातील चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शस्त्र सापडल्यानंतर सुरुवातीला अल्पवयीन मुले आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य घरातून पळून गेले होते. परंतु गुरुवारी दोन्ही अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. याचबरोबर शस्त्र लपवण्यास मदत करणाऱ्या आरोपीच्या एका नातेवाइकाला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. चौथ्या प्रौढ आरोपीचा शोध अजूनही सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.