दिल्लीत हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहांमधून मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या कारवाईविरोधात आता काँग्रेसकडून तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकांसाठीचं वातावरण तयार होऊ लागलं आहे. इंडिया आघाडीच्या निमित्ताने भाजपाला आव्हान देण्याची तयारी विरोधकांनी चालवली आहे. मात्र, आघाडीत काही कच्चे दुवे असल्याचं मित्रपक्ष मान्य करत आहेत. त्यावरच ठाकरे गटानं बोट ठेवत काँग्रेसला युतीचं महत्त्व शिकून घ्यायच्या कानपिचक्या दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया आघाडीची आज दिल्लीत बैठक होत असून सर्व घटकपक्षांचे प्रमुख वा प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये झालेला काँग्रेसचा पराभव इंडिया आघाडीसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. त्यावर या बैठकीत विचारमंथन होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात सामना अग्रलेखातून भाष्य करण्यात आलं आहे.

“दिल्लीत नुसते जमायचे, जेवणावळी करायच्या आणि हात पुसत…”

‘इंडिया’ आघाडीची बैठक आज राजधानी दिल्लीत होत आहे. या बैठकीसाठी काँग्रेसने पुढाकार घेतला हे बरे झाले. केजरीवाल यांच्या पक्षावर भाजपकडून हल्ले सुरू आहेत. त्यांचे प्रमुख नेते तुरुंगात आहेत व ‘आप’चा एकाकी लढा सुरू आहे. अशा वेळी मोठा भाऊ म्हणून काँग्रेसने पुढे येऊन ऐक्याची भावना दाखवायला हवी. दिल्लीत नुसते जमायचे, जेवणावळी करायच्या व प्रत्येकाने हात पुसत घरी जायचे या व्यवस्थेत आता सुधारणा व्हायला हवी”, अशी टिप्पणी ठाकरे गटानं केली आहे.

“काँग्रेसला विजयाचा ‘केक’ एकट्याला खायचा होता”

“राजस्थान, छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता होती. मध्य प्रदेशात बदलाचे वारे वाहत होते व वातावरण काँग्रेससाठी चांगले आहे, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. ‘भारत जोडो’ यात्रेची सुरुवातच मध्य प्रदेशातून झाली. पण काँग्रेसचा सगळ्यात दारुण पराभव मध्य प्रदेशात झाला. भरवशाच्या म्हशीला ‘टोणगा’च झाला. तिन्ही राज्ये ‘इंडिया’ने गमावली नसून काँग्रेसने गमावली. काँग्रेसला विजयाचा ‘केक’ एकट्याला खायचा होता. त्यामुळे राज्यातील लहान पक्ष, आघाड्या वगैरेंना दूर ठेवले”, अशा शब्दांत ठाकरे गटानं काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.

“माझ्या पायात चप्पल राहणार की नाही हे काळ ठरवेल, पण…”, खडसेंनी महाजनांना दिलं थेट आव्हान

“यापुढे ‘इंडिया’ आघाडी म्हणून काँग्रेसने युतीचे महत्त्व शिकायला हवे. ‘इंडिया’ आघाडीचे महत्त्व वाढवायला हवे. रथाला आज २७ घोडे आहेत, पण रथाला सारथी नाही. त्यामुळे रथ अडकून पडला आहे. ‘इंडिया’ आघाडीला संयोजक, समन्वयक, निमंत्रक जो काही असेल तो हवा आहे. अशा समन्वयकाची गरज नाही व आहे त्या परिस्थितीत ‘चालवू’ असे कुणाचे म्हणणे असेल तर ते ‘इंडिया’चे नुकसान करीत आहेत. रथाचा सारथी आता नेमावा लागेल”, अशी गरज ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

“मोदींसमोर कोण, या प्रश्नाचे उत्तर…”

“२०२४ साठी ‘इंडिया’ आघाडीचा ‘चेहरा’ कोण? याचा फैसलाही करावा लागेल. मोदींसमोर कोण? हा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल.’आमच्याकडे पंतप्रधान पदासाठी भरपूर चेहरे आहेत. चॉइसच चॉइस आहे’, असे सांगणे म्हणजे ‘दिल बहलाने के लिए खयाल अच्छा है’ त्यातलाच हा प्रकार. ‘हजार आचारी व रस्सा भिकारी’ या भूमिकेतून बाहेर पडावे लागेल. काँग्रेस पक्षाला भाजपचा पराभव करायचा असेल तर आपल्या सहकारी मित्रांसोबत या दोन्ही विषयांवर चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. नुसता मोठेपणाचा आव आणून चालणार नाही”, असा सल्लाही ठाकरे गटानं काँग्रेसला दिला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uddhav thackeray faction sanjay raut slams congress on india alliance meeting in delhi pmw
First published on: 19-12-2023 at 08:05 IST