लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलं आहे. पहिल्या टप्प्यात २९ राज्यांमद्ये १०२ जागांसाठी मतदान पार पडलं आहे. जवळपास ५५ टक्के मतदान झालं असून मतांची टक्केवारी राजकीय विश्लेषकांसाठी चिंतेचा विषय ठरली आहे. महाराष्ट्रात अजूनही मतदानाचे ४ टप्पे शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या सविस्तर मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी अनेक राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी आघाडी सरकार स्थापन करण्यासंदर्भात भूमिका मांडतानाच भाजपासोबत पुन्हा जाण्याच्या शक्यतेवरही भाष्य केलं.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

यावेळी उद्धव ठाकरेंनी भाजपा वापरा व फेकून द्या या तत्वानुसार काम करत असल्याची टीका केली. “२०१९च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी शिवसेना व भाजपाला प्रत्येकी अडीच वर्षं मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं होतं. देवेंद्र फडणवीसांनी आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करण्याचं वचन दिलं होतं. ते स्वत: दिल्लीत जाणार होते. पण आता त्यांनी मला माझ्याच लोकांसमोर खोटं पाडलं”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी त्यांचा संताप व्यक्त केला.

“२७०० दिवस उलटले, काय झालं?

दरम्यान, उद्धव ठाकरेंनी नोटबंदीच्या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य केलं. “भारतीय जनता पक्षाची गॅरंटी पोकळ आहे. नोटबंदीनंतदर मोदी म्हणाले होते की ‘मला फक्त १०० दिवस द्या’. एप्रिल २०२४मध्ये त्या गोष्टीला २७०० दिवस झाले. काय झालं? ते म्हणाले होते की ते शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतील. पण त्याऐवजी शेतकऱ्यांचा खर्च दुप्पट झाला आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“भारत सरकार नव्हे, मोदी सरकार”

सर्वात मोठी समस्या काय आहे? यावर उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारबाबत भूमिका मांडली. “माझ्यााठी सर्वात मोठी समस्या ही आहे की मला भारत सरकार हवंय, मोदी सरकार नाही. जर एकच पक्ष प्रबळ असेल, तर हे देशासाठी धोकादायक आहे. माझ्या वडिलांच्या काळात आम्हाला असं वाटलं की एक प्रबळ सरकार केंद्रात असायला हवं. पण अटल बिहारी वाजपेयींनी आघाडी सरकार यशस्वीपणे चालवलं. नरसिंह राव यांच्या सरकारनं आर्थिक सुधारणा आणल्या. आता काळ बदलला त्याप्रमाणे देशाला असं सरकार हवंय जे अनेक पक्षांना सोबत घेऊन वाटचाल करेल”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“फडणवीस म्हणाले होते, ते आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी तयार करतील आणि स्वत:…”, उद्धव ठाकरेंचा मोठा दावा…

दरम्यान, यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा भाजपासोबत जाण्याबाबतही भाष्य केलं. भविष्यात पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती होण्याची शक्यता वाटते का? असा प्रश्न विचारताच उद्धव ठाकरे म्हणाले, “मी असं का करेन? माझी अनेकदा फसवणूक झाली आहे. माझ्या दृष्टीने भाजपाचा खरा चेहरा आता उघड झाला आहे”, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भविष्यात पुन्हा ते भाजपासोबत जाण्याची शक्यता फेटाळून लावली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत-पाकिस्तान सामने होऊ द्याल का?

दरम्यान, केंद्रात आघाडीचं सरकार आलं आणि ठाकरे गट त्या सरकारचा हिस्सा असल्यास पुन्हा भारत-पाकिस्तान सामने होऊ देणार का? असा प्रश्न या मुलाखतीत उद्धव ठाकरेंना विचारण्यात आला. तेव्हा त्यावर बोलताना त्यांनी मोदींना लक्ष्य केलं. “मी नक्कीच (मोदींप्रमाणे) नवाज शरीफ यांच्यासोबत केक खाणार नाही. भाजपा फक्त पाकिस्तानबद्दल बोलते. पण ते चीनबद्दल उत्तर का देत नाही? चीन आपल्या हद्दीत येत आहे, आपल्या भूभागाची नावं बदलत आहे. चीन काही क्रिकेट खेळत नाहीये”, असं ते म्हणाले.