एकीकडे रशियाचं सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये शिरलं असताना दुसरीकडे या सगळ्या घडामोडींचा आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमका काय परिणाम होणार आहे? याचा अंदाज आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार लावण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी नेमका रशियानं युक्रेनवर हल्ला का केला? याच्या मुळाशी देखील जाण्याचा प्रयत्न केला जात आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी “युक्रेनचं निर्लष्करीकरण करणे आणि युक्रेनला नाझीमुक्त करणे हे आपलं मुख्य ध्येय आहे” असं म्हटलेलं आहे. पण आता युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी पुतीन यांचा दावाच खोटा ठरवला आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी युद्धाच्या दुसऱ्या दिवशी देशवासीयांसाठी आणि जगातील इतर देशांसाठी जारी केलेल्या एका व्हिडीओ संदेशामध्ये आपण राजधानी कीवमध्येच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यापाठोपाठ आता त्यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी ते नाझी असल्याचा आणि त्यांच्यापासून युक्रेनला मुक्त करण्याचा केलेला दावाच खोडून काढला आहे.

रशियाची तुलना हिटलरच्या अधिपत्याखालील जर्मनीशी!

“मी तर ज्यू आहे. मी नाझी कसा असू शकेन?” असा सवालच राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी विचारला आहे. वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी रशियाच्या युक्रेनवरील हल्ल्याची तुलना हिटलरच्या अधिपत्याखालील जर्मनीनं दुसऱ्या महायुद्धात केलेल्या आक्रमणाशी केली आहे.

रशियन फौजा आज दुपारी युक्रेनची राजधानी कीवमध्ये शिरल्या आहेत. युक्रेनच्या सैन्यानं या फौजांना कडवा प्रतिकार करायला सुरुवात केली आहे. मात्र, मोठ्या संख्येनं रशियन सैनिक राजधानीत शिरले असून हल्ले सुरू केले आहेत. यादरम्यान, वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी देशवासीयांना उद्देशून एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये आपण देश सोडून पळ काढणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

“मला माहिती आहे की ते माझ्यासाठीच येत आहेत, पण मी राजधानीतच आहे, पळून जाणार नाही”, युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी व्यक्त केला निर्धार!

“मला माहिती आहे ते माझ्यासाठीच येतायत”

वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या निवेदनामध्ये रशियाच्या हल्ल्यापुढे नमणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. “शत्रूनं (रशिया) मला त्यांचा नंबर वन टार्गेट केलं आहे. माझं कुटुंब हे त्यांचं नंबर दोनचं टार्गेट आहे हेही मला माहिती आहे. त्यांना युक्रेनच्या राष्ट्रप्रमुखालाच लक्ष्य करून युक्रेनला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करायचं आहे. पण मी कुठेही पळून जाणार नाही. मी राजधानीतच राहणार आहे. माझं कुटुंब देखील युक्रेनमध्येच आहे”, असं वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी जारी केलेल्या व्हिडीओ संदेशामध्ये म्हटलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ukrain president volodymr zelensky rejects putin claim on nazi origin russia invades kyiv pmw
First published on: 25-02-2022 at 15:34 IST