योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर येथील सरकारी कार्यालयांतील चित्र मोठ्याप्रमाणावर पालटायला सुरूवात झाली आहे. योगी आदित्यनथांनी काही दिवसांपूर्वी  राज्य सरकारच्या कार्यालयांमध्ये पान मसाला, गुटखा आणि तंबाखुच्या सेवनावर बंदी घातली होती. त्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांची चांगलीच गोची झाली आहे. पान आणि गुटख्याची तल्लफ भागविण्यासाठी या अधिकाऱ्यांवर च्युईंगम आणि गोळ्या चघळाव्या लागत आहेत. याशिवाय, सर्व अधिकारी वेळेवर येऊ लागल्यामुळे मंत्रालयाच्या परिसरात पार्किंगसाठी जागा मिळणेही मुश्किल होऊन बसले आहे. एकुणच सरकारी अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीचा धसका घेतला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबद्दल मंत्रालयातील एका शिपायाला विचारण्यात आले असता त्याने म्हटले की, आता कामावर पूर्ण उपस्थिती असते, बाबू लोकांनी काम करायला सुरूवात केली आहे. त्यामुळेच सकाळच्या वेळेत गाड्यांच्या पार्किंगसाठी जागा मिळत नाही. यापूर्वी परिस्थिती अगदी उलट होती. ‘साहेब ऑफिसमध्ये लंचनंतर येतील’ किंवा ‘चल चहा पिऊन येऊ’, अशा धाटणीची वाक्य सर्रासपणे ऐकायला मिळत होती, असे या शिपायाने सांगितले.

काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात एका अधिकाऱ्याने गुटखा खाणाऱ्या एका शिपायाला चांगलेच झापले होते. त्यामुळे या शिपायाला नाईलाजाने गुटख्याचे पाकिट खिशात ठेवावे लागले होते. विधानभवनातील कर्मचाऱ्यानेही आता कार्यालयातील गुटखा आणि पानमसाला खाणाऱ्या कर्मचाऱ्यांनी नाईलाजाने का होईना च्युईंगम आणि गोळ्या खायला सुरूवात केली आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कार्यालयांमध्ये आता लोक काहीही खाल्ल्यानंतर कागद इतरत्र न फेकता स्वत:च्या खिशात ठेवतात, असेही या कर्मचाऱ्याने सांगितले. योगी आदित्यनाथ यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर सरकारी अधिकाऱ्यांना वेळ पडल्यास १५ ते २० तास काम करण्याचे आवाहन केले होते. नव्या सरकारमधील मंत्रीही स्वत: वेळेवर येऊन आपल्या खात्याच्या कर्मचाऱ्यांसमोर आदर्श निर्माण करायचा प्रयत्न करत आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Under cm yogi adityanath govt offices wake up to new work culture
First published on: 30-03-2017 at 14:03 IST