Amit Shah on PM Narendra Modi: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना देशाच्या आधीच्या पंतप्रधानांशी केली आहे. मोदींच्या आधी भारताच्या परराष्ट्र धोरणाला कणाच नव्हता, असं अमित शाह म्हणाले आहेत. अमित शाह यांच्या या विधानांचा रोख हा काँग्रेसच्या पंतप्रधानांच्या दिशेनं असला, तरी मोदींच्या आधी भारताचं परराष्ट्र धोरण खंबीर नव्हतं, असं म्हणत त्यांनी आधीच्या सर्वच पंतप्रधानांशी मोदींची तुलना केली आहे. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी मोदींबाबतची ही भूमिका मांडली आहे.

काय म्हणाले अमित शाह?

गेल्याच आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस झाला. या पार्श्वभूमीवर झालेल्या या मुलाखतीमध्ये अमित शाह यांना मोदींबाबत काही प्रश्न विचारण्यात आले. त्यावर शाह यांनी मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला. तसेच, मोदींच्या काळातच देशासाठी सर्वात मोठ्या गोष्टी साध्य झाल्या आहेत, असा दावाही अमित शाह यांनी केला आहे.

“जेव्हा कधी इतिहासकार वेगवेगळ्या पंतप्रधानांची तुलना करतील, तेव्हा मोदींच्या काळातच देशासाठीच्या सर्वात मोठ्या गोष्टी साध्य झाल्या आहेत हे त्यांच्या लक्षात येईल. मोदींमुळेच आपल्या परराष्ट्र धोरणाला खऱ्या अर्थाने कणा मिळाला आहे. त्याआधी आपलं परराष्ट्र धोरण खंबीर नव्हतं”, असं अमित शाह म्हणाले.

पंडित जवाहरलाल नेहरूंशी तुलना

या मुलाखतीत अमित शाह यांना विशेषकरून भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी मोदींची तुलना करता दिसणाऱ्या फरकाबाबत विचारणा करण्यात आली होती. पंडित जवाहरलाल नेहरू हे देशाचे आत्तापर्यंतचे सर्वाधिक काळ पदावर राहिलेले पंतप्रधान आहेत. त्यांच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी असून आत्तापर्यंत त्यांची ११ वर्षांची पंतप्रधानपदाची कारकिर्द झाली आहे.

“आधी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये राजकीय शिष्टाचाराला देशाच्या सुरक्षेपेक्षा जास्त महत्त्व दिलं जायचं. पण आता पाकिस्ताननं दहशतवादी हल्ला केल्यानंतर आम्ही एका क्षणाचाही विलंब न करता प्रत्युत्तर देण्याची योजना तयार केली. पुढच्या महिन्याभरात पाकिस्तानला आम्ही सडेतोड उत्तर दिलं”, असं अमित शाह यांनी नमूद केलं. “आता भारतीयांचं रक्त अशा प्रकारे सांडलं जाणार नाही. आम्ही हे पाकिस्तानला स्पष्टपणे अधोरेखित केलं आहे”, असंही ते म्हणाले.