श्रीनगर : यंदाच्या अमरनाथ यात्रेसाठी सुरक्षा दलांनी अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारली आहे. यात्रेकरूंच्या जीवाला  धोक असल्याने सुरक्षा दले अधिक सतर्क आहेत, असे वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने शनिवारी सांगितले. अमरनाथ यात्रेकरूंवर दहशतवाद्यांचा हल्ला होण्याचा इशारा दरवर्षी देण्यात येतो. परंतु यंदा हल्ल्याची अधिक शक्यता वर्तवण्यात आली आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. चार वर्षांनंतर पहिल्यांदाच यात्रेसाठी परवानगी देण्यात आली आहे. २०१९ मध्ये मध्यावर यात्रा रद्द करण्यात आली होती. तर २०२० आणि २०२२ मध्ये  करोना साथीमुळे यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे यंदा यात्रेकरूंची संख्या तिप्पट वाढण्याची शक्यता आहे. सुरक्षा व्यवस्था करताना ही बाब लक्षात घेण्यात येत आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.

यंदा यात्रेकरूंची संख्या दुप्पट तिप्पट होण्याचा अंदाज आहे. यामुळे अगोदरच्या यात्रांपेक्षा अधिक सुरक्षा दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत, असे सांगितले. यंदा अमरनाथ यात्रा ३० जून रोजी सुरू होणार असून ११ ऑगस्टला समाप्त होणार आहे.

अल्पसंख्याकांवरील हल्ले

जम्मू काश्मीरमध्ये अल्पसंख्याक समाजातील सरकारी कर्मचाऱ्यांना लक्ष्य करून त्यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत. या पार्श्वभूमीवरही यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी अधिक जवान तैनात करण्यात आले आहेत. ड्रोन आणि आरएफआयडी चिपचा वापर हासुद्धा त्रिस्तरीय सुरक्षेचा भाग आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.