भाजपा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून विधानसभा निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत आहे. भाजपामध्ये तिकीट वाटपावरून विचारमंथन सुरू झाले आहे. यासाठी मंगळवारी दिल्लीत कोअर कमिटीची बैठक झाली. यामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे त्यांच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह उपस्थित होते. दिल्लीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार यावरही चर्चा झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून लढले तर संपूर्ण राज्यात हिंदुत्वाचा संदेश जाईल, पक्षातील नेत्यांचे म्हणणे आहे. मात्र, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मथुरा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती.
भाजप खासदार हरनाथ यादव यांनीही पक्षाध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मुख्यमंत्री योगी यांना मथुरेतून निवडणूक लढवावी, अशी मागणी केली होती. माझ्या स्वप्नात भगवान कृष्ण आले होते आणि म्हणाले होते की, मथुरेतून मुख्यमंत्री योगींना लढायला सांगा, असे हरनाथ यादव यांनी म्हटले होते. गोरखपूरमधून पाच वेळा खासदार राहिलेले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे हिंदुत्वाचा मोठा चेहरा मानले जातात. मठानंतर आता त्यांच्या अयोध्येत येण्याने भाजपाला नवी उभारी मिळू शकते. त्यांना मथुरा किंवा अयोध्येतून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा आधीपासूनच होती.
यावेळी काशी, मथुरा आणि अयोध्याबाबत भाजपमध्ये कमालीची उत्सुकता आहे. अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू आहे, तर काशीमध्ये विश्वनाथ धाम कॉरिडॉर बांधण्यात आला आहे. मथुरेतही उत्तर प्रदेश सरकारने अनेक प्रकल्प सुरू केले आहेत. पक्षाच्या एका नेत्याने सांगितले की, “गोरखपूरच्या जागेबाबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबाबत चर्चा केली होती. पण धार्मिक दृष्टिकोनातून अयोध्येला अधिक महत्त्व आहे. योगी अयोध्येतून लढले तर भाजपाने आपली राजकीय उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी मूलभूत तत्त्वांशी तडजोड केलेली नाही, असा संदेश जाईल.”
दरम्यान, भाजपा पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सत्तेत येण्यासाठी कामाला लागले आहे. राज्य सरकारच्या कामामुळे आणि केंद्राच्या योजनांमुळे पक्ष पुन्हा एकदा २७० ते २९० जागा जिंकण्याच्या स्थितीत असल्याचे पक्षाचे नेते म्हणाले. ही निवडणूक अनेक टप्प्यात होणार आहे. त्यामुळे प्रत्येक पायरीनंतर स्थितीत फरक असू शकतो. पक्षाच्या नेत्याने सांगितले की, आम्हाला पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये सहज विजयाची आशा आहे.