उत्तर प्रदेशमधील कनूज येथे एक विचित्र प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका कुटुंबाने मेथी समजून चक्क गांज्याची भाजी खाल्ल्याची माहिती समोर आली आहे. येथील मियागानी गावामध्ये हा प्रकार घडला आहे. येथील एका भाजी विक्रेत्याने मेथीच्या नावाखाली या कुटुंबातील निलेश नावाच्या व्यक्तीला चक्क गांजा वनस्पतीची जुडी विकली. आपण मेथीऐवजी दुसरेच काहीतरी घेऊन चाललोय याची निलेशला कल्पनाही नव्हती. घरी आल्यावर निलेशने त्याच्या वहिनीला ही भाजी दिली.
दुपारी चारच्या सुमारास पिंकीने ही मेथी समजून ही भाजी केली. त्यानंतर कुटुंबातील सहा जणांनी दुपारी पाचच्या सुमारास ही भाजी खाल्ल्याचे अमर उजालाने आपल्या वृत्तात म्हटलं आहे. मात्र भाजी खाल्ल्यानंतर काही वेळात या कुटुंबातील सदस्यांना त्रास होऊ लागला. एक एक करत सर्वांचीच तब्बेत बिघडली. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने डॉक्टरांशी संपर्क साधला. डॉक्टरांना फोन करेपर्यंत कुटुंबातील सर्व सस्यांची शुद्ध हरपली आणि ते बेशुद्ध पडले.
शेजाऱ्यांनी हा काहीतरी विचित्र प्रकार असल्याचे समजून थेट पोलिसांना फोन केला. त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत या सहाही जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली असता त्यांना ्स्वयंपाकघरात कढईमध्ये शिजवलेली गांजांची भाजी दिसली. तसेच उरलेली गांजाची पानही त्यांना दिसली. पोलिसांनी ही शिजवलेली गांजाची भाजी आणि न शिजवलेली पान दोन्ही ताब्यात घेतलं आहे. या सहाही जणांची प्रकृती सध्या स्थिर आहे.
या प्रकरणात पोलिसांनी भाजी विक्रेत्याला ताब्यात घेतलं आहे. या भाजी विक्रेत्याची चौकशी केली असता तो निलेशला ओळखतो अशी माहिती समोर आली आहे. आपण केवळ मस्करी म्हणून मेथीऐवजी गांजाची पानं निलेशला दिल्याचे या भाजीवाल्याने सांगितलं.
या प्रकरणात संबंधित कुटुंबाने गुन्हा तक्रार केल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
