प्रयागराज, रांची : गेल्या शुक्रवारच्या नमाजानंतर झालेल्या हिंसक निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर रविवारी उत्तर भारतातील अनेक शहरांमधील परिस्थिती तणावपूर्ण होती. उत्तर प्रदेशातील सहारणपूर हिंसाचारातील कथित आरोपींच्या घरांवर बुलडोझर चालवल्यानंतर रविवारी प्रयागराज येथील आणखी एका संशयित आरोपीचे घर मोठय़ा पोलीस बंदोबस्तात बुलडोझरने जमीनदोस्त करण्यात आले. तर रांचीत अभूतपूर्व तणाव असून तेथील पोलीस गोळीबारातील मृतांची संख्या दोन झाली आहे.   

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नूपुर शर्मा यांनी प्रेषित मुहम्मद यांच्यावर केलेल्या अवमानकारक शेरेबाजीच्या निषेधार्थ शुक्रवारी प्रयागराज येथे निदर्शनांदरम्यान हिंसाचार घडला होता. हिंसाचारातील अन्य आरोपींसह मोहम्मद जावेद हेही एक कथित आरोपी असून त्यांचे बेकायदा निवासस्थान रविवारी बुलडोझरने पाडण्यात आले. प्रयागराज विकास प्राधिकरणाने (पीडीए) ही कारवाई केली.  सामाजिक कार्यकर्ता असलेल्या जावेद यांना आधी नोटीस बजावून घर रिकामे करण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर रविवारी सकाळी ही कारवाई करण्यात आली. जावेद अटकेत असून शुक्रवारी प्रयागराज येथे घडलेल्या हिंसाचाराच्या कटातील ते एक आरोपी असल्याचा दावा पोलिसांनी केला. अन्य आरोपींच्या चौकशी दरम्यान जावेद यांचा हिंसाचारातील सहभाग उघड झाला. त्यांनी लोकांना बंद पाळण्याचे आवाहन करून निदर्शनांसाठी एकत्र येण्याचा संदेश व्हॉटसअ‍ॅपद्वारे प्रसारित केला होता, असेही पोलिसांनी सांगितले.  

जावेद हे वेल्फेअर पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य आहेत. त्यांची मुलगी, आफरीन फातिमा ही दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाची विद्यार्थिनी आहे. तसेच ती अलिगढ मुस्लीम विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेची माजी अध्यक्ष आहे.

भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषिताबद्दल केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ उत्तर प्रदेशातील अन्य चार शहरांमध्येही निदर्शने झाली होती. प्रयागराजमध्ये शुक्रवारी जमावाने काही वाहनांची जाळपोळ केली होती. तसेच पोलिसांचे वाहनही जाळण्याचा प्रयत्न केला होता. आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर आणि लाठीमार केला होता. या वेळी एक पोलीसही जखमी झाला होता. त्यानंतर शनिवारी सहारणपूर येथे दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन आरोपींच्या मालमत्ता स्थानिक प्रशासनाने पाडल्या होत्या.

झारखंडची राजधानी रांचीमध्ये रविवारी तणाव निर्माण झाला होता. तेथील संवेदनशील भागांत सुमारे २,५०० पोलीस तैनात असून रविवारी दुकाने आणि इतर आस्थापना बंद होत्या. इंटरनेट सेवा ३३ तासांनंतर रविवारी पूर्ववत करण्यात आली असली तरी जमावबंदीचा आदेश मात्र लागू आहे.

रांचीतील मृत दहावीचा विद्यार्थी

रांचीतील हिंसाचारातील मृतांची संख्या दोन झाली आहे. त्यापैकी एकाचे नाव साहिल (वय २०), तर दुसऱ्याचे मुदस्सीर (१५) आलम असे आहे. मुदस्सीर या दहावीचा विद्यार्थी होता, अशी माहिती पोलिसांनी दिली. रांची हिंसाचारातील जखमींची सख्या २४ हून अधिक आहे. अनेक जण गोळय़ा लागून जखमी झाले आहेत. रांचीत १० हजारांहून अधिक अनोळखी लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.