Juice Seller Got Income Tax Notice : मोठ-मोठ्या व्यापाऱ्यांना कोट्यवधींच्या थकबाकीच्या प्राप्तिकर नोटिसा (IT Notice) आल्याचं तुम्ही ऐकलं असेल. पण एखाद्या साध्या ज्युस विक्रेत्याला कोट्यवधींच्या थकबाकीची प्राप्तिकर नोटीस आली तर? तुम्हालाही धक्का बसला ना? पण हे खरं आहे. उत्तर प्रदेशातील एका ज्युस विक्रेत्याला तब्बल ७.७९ कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस आली आहे. धक्कादायक म्हणजे हा ज्युस विक्रेता दिवसाला अवघे ४०० रुपयेच कमावतो. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

१८ मार्च रोजी अलीगड येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात ज्युस विक्रीचा स्टॉल लावणाऱ्या मोहम्मद रहीस याला ७.७९ कोटी रुपयांच्या थकबाकीची नोटीस आली. तो कामगार वर्गाच्या वस्तीतील सराई रहमान येथे राहतो. ही नोटीस येताच त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. या नोटिशीला कसं उत्तर द्यायचं हेच त्याला समजत नव्हते. त्यासाठी त्याने त्याच्या मित्रांकडून मदत मागितली. या नोटिशीला २८ मार्चपर्यंत उत्तर देण्यात निर्देश देण्यात आले आहेत.

ज्युस विक्रेता दिवसाला कमावतो अवघे ४०० रुपये

माध्यमांशी बोलताना रहीस म्हणाला, “मला आयकर वकिलाचा सल्ला घेण्याचा सल्ला देण्यात आला. या नोटिशीला उत्तर देण्याआधी त्यांनी माझ्या बँक खात्याचे रेकॉर्ड्स तपासण्याचा सल्ला दिला आहे.” राहीस दिवसाला जेमतेम ४०० रुपये कमवतो. तो त्याच्या वृद्ध आणि आजारी पालकांसह त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे पालनपोषण करतो. अनपेक्षित नोटिशीमुळे तो खूप दुःखी झाला आहे.

“या नोटिशीच्या धक्क्याने तीव्र चिंता निर्माण झाली आहे आणि माझा रक्तदाब वाढला आहे. या संकटाचा सामना कसा करायचा हे मला कळत नाही”, असंही तो म्हणाला. त्याने असेही नमूद केले की त्याची आई आधीपासूनच नैराश्येत असून या नोटीशीमुळे ती अधिक चिंताग्रस्त झाली आहे.