पोलिसांना प्रशासनाला सामान्य जनतेचे रक्षक म्हटले जाते. सामान्य नागरिकाचे रक्षण करणे तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांकडे आहे. मात्र याच पोलीस अधिकाऱ्यांवर लाच घेतल्यामुळे किंवा अवैध काम केल्यामुळे कारवाई होते. कधीकधी तर पोलिसांचे असे काही अजब कारनामे समोर येतात की त्याची चर्चा देशभरात होते. सध्या उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथील पोलिसांची चांगलीच चर्चा होत असून पूर्ण उत्तर प्रदेश पोलिसांवर टीका केली जात आहे.

प्रयागराजमधील पोलिसाने नेमकं काय केलं?

उत्तर प्रदेशमधील एका पोलीस अधिकाऱ्याने चक्क एका LED बल्बची चोरी केली आहे. त्याने केलेल्या या चोरीचा सर्व घटनाक्रम सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. रात्रीच्या अंधारात त्याने ही चोरी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरीची ही घटना प्रयागराज येथील आहे. रात्री गस्त घालताना हा पोलीस अधिकारी एका घरासमोर उभा असल्याचे दिसत आहे. तो चोरपावलांनी LED बल्बकडे येत असल्याचे दिसत आहे. तसेच आजूबाजूला कोणीही नसल्याचे समजताच त्याने घरासमोरचा LED बल्ब काढून आपल्या खिशात घातल्याचं दिसतंय. बल्बची चोरी करताच हा पोलीस अधिकारी तेथून निघून गेला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर चांगलाच चर्चेचा विषय ठरतोय. नेटकरी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करत आहेत. तसेच या पोलिसावर उत्तर प्रदेश प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, टीकेला तोंड द्यावे लागत असताना प्रयागराज पोलिसांनी या घटनेची दखल घेतली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुलपूर पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.