उत्तराखंडमध्ये गेल्या महिन्यात आलेल्या महापुरात बेपत्ता झालेल्या पर्यटकांमध्ये सर्वाधिक उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती पुढे आली आहे. 
उत्तर प्रदेशातील १५६४ व्यक्तींचा अद्याप शोध लागलेला नाही. उत्तर प्रदेश खालोखाल राजस्थानमधील ८२०, तर मध्य प्रदेशातील ५०४ पर्यटक बेपत्ता आहेत. महाराष्ट्रातून चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये गेलेले २९६ भाविक अजून बेपत्ता आहेत. वेगवेगळ्या राज्यांतून उत्तराखंडमध्ये आलेले सुमारे ४५०० पर्यटक अद्याप बेपत्ता असल्याचे उत्तराखंड सरकारमधील सूत्रांनी सांगितले. उत्तराखंड राज्यातील ७९५ नागरिक महापुरामध्ये बेपत्ता झाले आहेत.
महापुरात बेपत्ता झालेल्या पर्यटकांचा अंतिम आकडा तयार करण्यासाठी उत्तराखंड सरकार वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करीत आहे. एफआयआर, सोशल नेटवर्किंग साईट्स, फेसबुकवर तयार करण्यात आलेले विशेष अकाऊंट, हेल्पलाईन क्रमांक या सर्व मार्गांनी उत्तराखंड सरकार यादी तयार करीत आहे. वेगवेगळ्या राज्यांनाही त्यांच्या राज्यातील बेपत्ता नागरिकांची यादी उत्तराखंड सरकारकडे पाठविण्यास सांगण्यात आले आहे. झारखंड आणि पॉंडेचरीवगळता सर्व राज्यांनी या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.