उत्तर प्रदेशातील बागपत इथे एका २८ वर्षीय महिलेने हुंड्याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या पीडित महिलेने तिच्या हातावर, पायांवर आणि पोटावर पेनाने आत्महत्येचे कारण लिहिल्याचे समोर आले. मंगळवारी रात्री या महिलेने विषप्राशन करून आत्महत्या केली. तिचा पती कुंदन आणि त्याच्या कुटुंबीयांकडून वारंवार होत असलेल्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे यामधून स्पष्ट झाले आहे.
माझ्या मृत्यूसाठी कुंदन आणि त्याचे कुटुंब जबाबदार आहे असे मृत महिला मनीषा हिने हाता-पायावर हिंदीमध्ये लिहिले होते.
आत्महत्या करण्यापूर्वी तिने मनीषा हिने तिच्या मृत्यूसाठी तिच्या सासरच्यांना जबाबदार सांगणारा एक व्हिडीओही बनवला होता. पोलिसांना मिळालेल्या या व्हिडीओमध्ये मनीषा रडत असल्याचे आणि तिचा पती, सासू-सासरे आणि दीर हुंड्यासाठी सतत तिचा छळ करत असल्याचे सांगताना दिसत आहे. तिच्या कुटुंबाने लग्नासाठी २० लाख रूपये खर्च केले आणि हुंडा म्हणून बुलेट मोटारसायकलही दिली होती तरीही त्यांनी तिच्याकडे वारंवार कार आणि पैशांची मागणी केल्याचे मनीषाने या व्हिडीओमध्ये म्हटले आहे. तसंच सासरचे लोक तिला मारहाणही करत असून अनेकदा तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचेही तिने सांगितले होते.
सासरच्यांच्या हुंड्या मागणीला नकार दिल्यानंतर त्यांनी मनीषाला वीजेचा शॉक देऊन मारण्याचाही प्रयत्न केला होता असा आरोपही तिने व्हिडीओ केला.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषाचे लग्न २०२३ मध्ये नोएडा इथे राहत असलेल्या कुंदनशी झाले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी तिच्या सासरच्यांनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव टाकायला सुरूवात केली.
मनीषाच्या मृत्यूच्या चार दिवस आधीच तिच्या आणि कुंदनच्या घटस्फोटाबाबत कुटुंबीयांनी विचार केला होता. असं असताना मनीषाने सासरच्या लोकांनी हुंड्याच्या वस्तू परत केल्या नाहीत तोपर्यंत ती घटस्फोटाच्या कागदावर सह्या करणार नाही असे सांगितले होते.