scorecardresearch

बीबीसी वृत्तपटावरून दिल्ली विद्यापीठ आवारात गोंधळ

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या आवारात शांतता कायम राखण्यासाठी विवेकानंद पुतळय़ाजवळ निदर्शने करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना हटवण्यात आले.

uproar in delhi university campus
दोन विद्यार्थ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याच्या विरोधात हे विद्यार्थी निदर्शने करत होते.

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाच्या कला शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी शुक्रवारी ताब्यात घेतले. विद्यापीठाच्या आवारात बीबीसीचे वृत्तपट दाखवण्यात सहभागी झाल्यावरून दोन विद्यार्थ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याच्या विरोधात हे विद्यार्थी निदर्शने करत होते. आपल्याशी पोलिसांनी आणि विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी गैरवर्तन केले, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला. विद्यापीठ प्रशासनाने हे आरोप फेटाळले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या आवारात शांतता कायम राखण्यासाठी विवेकानंद पुतळय़ाजवळ निदर्शने करणाऱ्या ११ विद्यार्थ्यांना हटवण्यात आले. तर निदर्शने करण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी कोणतीही परवानगी घेतली नव्हती, असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. विद्यार्थ्यांचे बेशिस्तपणाचे वर्तन खपवून घेतले जाणार नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तर आपली निदर्शने विद्यापीठाच्या कठोर कारवाईविरोधात होती, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. निदर्शनांपूर्वी पोलीस आणि निमलष्करी दलांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. दोन विद्यार्थ्यांवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या विरोधात बेमुदत संप करण्यासाठी विद्यार्थी जमले होते. या वेळी दिल्ली पोलीस आणि विद्यापीठाच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना मारहाण केली, तसेच जवळपास २५ विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले, असे ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनचे (एआयएसए) दिल्ली अध्यक्ष अभिज्ञान यांनी सांगितले. आपल्या आरोपाच्या पुष्टय़र्थ या विद्यार्थ्यांनी अनेक व्हिडीओ सामायिक केले आहेत.

या कारवाईतून पोलीस, भाजप-संघाचा पाठिंबा असलेले प्रशासन यांच्यामधील संधान दिसून येते. आम्ही अशा उपायांनी घाबरणार नाही आणि कारवाई मागे घेत नाही तोपर्यंत निदर्शने सुरूच ठेवणार.

अंजली, एआयएसए सचिव, दिल्ली विद्यापीठ

ते परवानगी न घेताच एकत्र जमले होते. पोलिसांचा रोष टाळण्यासाठीच त्यांनी निदर्शने सुरू केली. त्यांच्यापैकी अनेक जण तर दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थीदेखील नाहीत.

रजन अब्बी, कुलशासक, दिल्ली विद्यापीठ

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-03-2023 at 04:35 IST

संबंधित बातम्या