Balochistan Liberation Army Terrorist Organization : अमेरिकेने ११ ऑगस्ट रोजी एक मोठा निर्णय घेतला होता. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (BLA) आणि तिची सशस्त्र शाखा असलेल्या ‘माजीद ब्रिगेड’चा समावेश अमेरिकेने दहशतवादी संघटनांच्या यादीत केला होता. अमेरिकेच्या या निर्णयाचा फायदा पाकिस्तानला होणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, असं असतानाच आता आणखी एक महत्वाची घडामोड समोर आली आहे.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (UNSC) पाकिस्तान आणि चीनने एकत्र येत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि तिची सशस्त्र शाखा असलेल्या ‘माजीद ब्रिगेड’ संघटनेवर बंदी घालण्याच्या मागणीचा प्रस्ताव मांडला. मात्र, पाकिस्तान आणि चीनच्या या संयुक्त प्रयत्नाला अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सने रोखलं आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानला धक्का बसला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि ‘माजीद ब्रिगेड’वर बंदी घालण्याच्या मागणीचा प्रस्ताव रोखताना अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सने संयुक्तपणे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १२६७ व्यवस्थेअंतर्गत काही नियमांचा दाखला देत अल्-कायदा किंवा आयएसआयएलशी (ISIL) जोडण्यासाठी पुरेसे पुरावे नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, अमेरिका, युनायटेड किंग्डम आणि फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या १९९९ च्या १२६७ च्या ठरावाचा संदर्भ दिला आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत बलुचिस्तान लिबरेशन आर्मी आणि माजिद ब्रिगेडवर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रातील पाकिस्तानचे प्रतिनिधी असीम इफ्तिखार अहमद यांनी ही मागणी केली आणि म्हटलं की, दहशतवादी गट आयएसआयएल, अल-कायदा, तहरीक-ए-तालिबान, बीएलए आणि माजीद ब्रिगेड हे अफगाणिस्तानातून सीमापार हल्ले करत आहेत. त्यामुळे पाकिस्तान १२६७ बीएलए आणि माजिद ब्रिगेडवर बंदी घालण्याची विनंती सादर करत आहे. आम्हाला आशा आहे की परिषद त्यांच्या दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी या यादीवर जलदगतीने कारवाई करेल”, असं अहमद यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत म्हटलं.

बलुच लिबरेशन आर्मी नेमकं काय आहे?

सन २००० च्या दशकाच्या सुरुवातीस बलुच लिबरेशन आर्मीची (BLA) स्थापना करण्यात आली. पाकिस्तान सरकारने बलुचींना आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या विकासापासून वंचित ठेवल्याचा त्यांचा आरोप असून त्यामुळेच बलुचिस्तानला स्वतंत्र करण्याचा उद्देश त्यांच्या आंदोलनामागे आहे. बलुच चळवळीच्या अभ्यासकांच्या मते, प्रखर राष्ट्रवादी विचारांचे बलुची नेते नवाब खैर बख्श मरी यांचा मुलगा बिलाच मरी याने या चळवळीचे नेतृत्त्व केले. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, सध्या बशीर झेब हा BLA चा प्रमुख आहे. या संघटनेत बलुचिस्तानातील मरी, बुगती आणि मेंगल या जमातींमधील तरुणांचा समावेश आहे. काही विश्लेषकांच्या मते, BLA ची सध्याची सदस्य संख्या ६,००० असली तरी, बलुचिस्तान स्वतंत्र व्हावा, अशी इच्छा असणाऱ्या व चळवळीस समर्थन देणाऱ्यांची संख्या अनेक पटींनी अधिक आहे.

माजीद ब्रिगेड काय आहे?

माजीद ब्रिगेडला BLA ची ‘विशेष सैनिकी तुकडी’ मानले जाते. या ब्रिगेडचे नाव माजीद लंगोवे सिनियर आणि माजीद लंगोवे ज्युनियर या दोन भावांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. १९७४ मध्ये क्वेट्टा दौऱ्यावर असताना तत्कालीन पाकिस्तानी पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांच्या हत्येच्या प्रयत्नात सिनियर माजीद मारला गेला, तर २०१० मध्ये पाकिस्तानी सुरक्षा दलांच्या कारवाईत सहकाऱ्याला वाचवताना ज्युनियर माजीदचा मृत्यू झाला. या दोन्ही भावांच्या सन्मानार्थ, BLA ने एक आत्मघातकी पथक स्थापन करून त्याला ‘माजीद ब्रिगेड’ असे नाव दिले.