US Energy Secretary Chris Wright says America has oil to sell : भारताच्या रशियाबरोबरच्या व्यापारवर अमेरिकेने सातत्याने आक्षेप घेतला आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताविरोधात आक्रमक भूमिका घेतल्या आहेत. या तेल खरेदीविरोधात दंडात्मक कारवाई म्हणून ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लादलं आहे. यामुळे भारत व अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. अशातच अमेरिकेचे ऊर्जामंत्री ख्रिस राईट यांनी भारताने रशियाकडून तेल खरेदी करण्याऐवजी जगातील इतर देशांकडून तेल खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.
न्यूयॉर्कमधील एका कार्यक्रमात ख्रिस राईट यांनी भारताचे वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या एका वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. गोयल म्हणाले होते की “भारत आगामी काळात काही ऊर्जा उत्पादनांवर अमेरिकेबरोबर सहकार्य वाढवू शकतो.” यावर राईट म्हणाले, “युक्रेनमधील युद्धाच्या संदर्भाने येणारी भू-राजकीय आव्हानं भारतानं मान्य केली आहेत.”
“रशियाकडून कोणीच तेल खरेदी करत नाही म्हणून…”
भारत व रशियामधील तेलाच्या व्यापाराबाबत राईट म्हणाले, “जगभरातील अनेक देश तेल निर्यात करतात. त्यामुळे भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्याची आवश्यकता नाही. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो कारण ते तेल स्वस्त आहे. मुळात कोणालाही रशियाकडून तेल खरेदी करायचं नाहीये. त्यामुळे रशिया स्वस्तात तेल विकत आहे. परंतु, भारताने केवळ स्वतःच्या फायद्याला प्राधान्य दिलं. भारताच्या या कृतीमुळे त्यांचे पैसे अशा लोकांच्या हातात जातायत जे हजारो लोकांची हत्या करत आहेत.”
भारत रशियाला युद्धासाठी पैसे पुरवतोय, अमेरिकेचा आरोप
जागतिक ऊर्जा व्यापार आणि युद्ध या दोन्ही गोष्टी एकमेकांशी संबंधित असल्याची टिप्पणी करत ख्रिस राईट म्हणाले, “चीन, भारत व तुर्कीये हे देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहेत. या तेलाच्या बदल्यात हे तिन्ही देश रशियाला युद्ध करण्यासाठी निधी पुरवत आहेत. हीच मोठी समस्या आहेत. आमची इच्छा आहे की युद्ध थांबावं. मला आशा आहे की भारतीयांना देखील युद्ध नको आहे. तसेच आम्ही भारताबरोबर ऊर्जा उत्पादनांवर सहकार्य वाढवू इच्छितो.”
“आमच्याकडे खूप तेल आहे”
ख्रिस राईट यांनी नवी दिल्लीला मॉस्कोकडून तेल खरेदी करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच ते म्हणाले, “आम्हाला भारतावर दंडात्मक कारवाई करण्याची अजिबात इच्छा नाही. उलट आम्हाला युक्रेनमध्ये शांतता हवी आहे. आम्हाला वाटतं की भारताने आमच्याकडून तेल खरेदी करावं. विकण्यासाठी आमच्याकडे खूप तेल उपलब्ध आहे. भारत पृथ्वीवरील इतर कुठल्याही देशाकडून तेल खरेदी करू शकतो. आमचा आक्षेप केवळ रशियन तेलावर आहे. आमच्याकडे तेल आहे, इतरही काही देशांकडे तेल आहे. भारताने ते तेल खरेदी करावं.”