अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी लेडी जिल बायडेन हे दोघेही दोन दिवसांनी भारतात होणाऱ्या जी २० परिषदेत सहभागी होणार होते. मात्र त्याआधीच दोघांचा कोव्हिड रिपोर्ट आला आहे आहे. ज्यानुसार फर्स्ट लेडी जिल बायडेन यांना करोना झाला आहे. जो बायडेन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. व्हाईट हाऊसने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
जिल बायडेन यांच्या कार्यालयाने हे म्हटलं आहे की जिल बायडेन यांच्यात करोनाची काहीही लक्षणं नाहीत. त्या आता डेलावेयर या ठिकाणी असलेल्या त्यांच्या निवासस्थानीच राहणार आहेत. व्हाईट हाऊसच्या मेडिकल युनिटने त्यांच्या निकटवर्तीयांना लेडी जिल बायडेन यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचं कळवलं आहे.
७१ वर्षीय जिल बायडेन १६ ऑगस्टला साऊथ कॅरोलिना या ठिकाणी सुट्टीसाठी गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्यासह राष्ट्रपती जो बायडेनही होते. तिथे त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता आणि जिल बायडेन या पाच दिवस क्वारंटाईन राहिल्या होत्या. आता पुन्हा एकदा त्यांचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडेन जी २० परिषदेत सहभागी होण्यासाठी ७ सप्टेंबरला म्हणजे दोनच दिवसांनी भारतात येणार होते. मात्र त्याआधीच ही बातमी समोर आली आहे.
