Former CIA officer John Kiriakou : अमेरिकन गुप्तचर संस्था सीआयएचे (CIA) माजी अधिकारी जॉन किरियाकौ यांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. जॉन किरियाकौ यांनी जवळपास १५ वर्षे सीआयएमध्ये काम केलेलं आहे. दरम्यान, जॉन किरियाकौ यांनी आता मोठा खुलासा केला आहे. ‘पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती तथा माजी लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी अमेरिकेला पाकिस्तानी अण्वस्त्रांचं नियंत्रण दिलं होतं’, असा मोठा दावा किरियाकौ यांनी केला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
तसेच जॉन किरियाकौ यांनी भारत आणि पाकिस्तानबाबतही भाष्य केलं आहे. भारताबरोबर लढून पाकिस्तानला कोणताही फायदा होणार नाही, हे पाकिस्तानला समजायला हवं. पाकिस्तान भारताविरोधातील कोणतंही पारंपारिक युद्ध जिंकू शकत नाही, असं जॉन किरियाकौ यांनी एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त जनसत्ताने दिलं आहे.
जॉन किरियाकौ यांनी काय म्हटलं?
“पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना अमेरिकेनं विकत घेतलं होतं आणि पाकिस्तानच्या अण्वस्त्रांची चावी अमेरिकेकडे होती. परवेझ मुशर्रफ हे त्यावेळी दुहेरी भूमिका वठवायचे. एकीकडे ते अमेरिकेला दहशतवादाविरुद्ध सहकार्य करण्याचं आश्वासन देत होते, तर दुसरीकडे ते पाकिस्तानी सैन्य आणि इतर दहशतवादी संघटनांना भारताविरुद्ध सक्रिय ठेवत असत”, असा दावा जॉन किरियाकौ यांनी केला आहे.
‘…तर अमेरिका अब्दुल कादीर खान यांनाही संपवू शकली असती’
पाकिस्तानला अणुशक्तीशाली बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांच्याबाबतही जॉन किरियाकौ यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. जॉन किरियाकौ यांनी म्हटलं की, “जर अमेरिकेने ठरवलं असतं तर अब्दुल कादीर खान यांनाही संपवलं असतं. पण सौदी अरेबियाच्या विनंतीवरून ही कारवाई करणं थांबवलं. खरंतर त्यावेळी सौदीला अब्दुल कादीर खान यांची गरज होती, कारण ते दोघे एका प्रोजेक्टवर एकत्र काम करत होते”, असं जॉन किरियाकौ यांनी म्हटलं.
EP-10 with Former CIA Agent & Whistleblower John Kiriakou premieres today at 6 PM IST
— ANI (@ANI) October 24, 2025
“Osama bin Laden escaped disguised as a woman…” John Kiriakou
“The U.S. essentially purchased Musharraf. We paid tens of millions in cash to Pakistan’s ISI…” John Kiriakou
“At the White… pic.twitter.com/pM9uUC3NIC
‘अमेरिकेचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे स्वार्थावर आधारित’
जॉन किरियाकौ यांनी अमेरिकेच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, “अमेरिका लोकशाहीबद्दल बोलत असली तरी अमेरिकेचं परराष्ट्र धोरण पूर्णपणे स्वार्थावर आधारित आहे. अमेरिका मानवी हक्कांचं रक्षण करत असल्याचं दाखवते. मात्र, प्रत्यक्षात फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार असतो.”
‘अमेरिकेला हुकूमशहांबरोबर काम करायला आवडतं’
“खरं सांगायचं तर अमेरिकेला हुकूमशहांबरोबर काम करायला आवडतं, कारण जनमत आणि माध्यमांची काळजी करण्याची गरज नसते, म्हणून आम्ही मुशर्रफ यांना विकत घेतलं. आम्ही पाकिस्तानला लाखो डॉलर्सची मदत दिली. आम्ही आठवड्यातून अनेक वेळा मुशर्रफ यांना भेटायचो. मुशर्रफ यांनी दहशतवादविरोधी लढाईत अमेरिकेशी सहकार्याचं नाटक करून लष्कराचा पाठिंबा कायम ठेवला, पण भारताविरुद्धच्या कारवाया सुरूच ठेवल्या होत्या”, असं जॉन किरियाकौ यांनी म्हटलं आहे.
