US on Bangladesh Sheikh Hasina allegations : शेख हसीना यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन केलं आहे. त्या सध्या भारतात असून त्यांनी बांगलादेशमधील अराजकतेला व सत्तांतराला अमेरिका जबाबदार असल्याचा आरोप केला आहे. अमेरिकेनेच त्यांना सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडल्याचं वक्तव्य शेख हसीना यांनी केलं आहे. बांगलादेश सरकारने अमेरिकेला बंगालच्या उपसागरातील सेंट मार्टिन बेट न दिल्यामुळे त्यांनी मला सत्तेवरून हटवण्याची योजना आखली होती, असा आरोप हसीना यांनी केला आहे. बांगलादेशकडून सेंट मार्टिन बेट घेऊन तिथे नौदल व लष्करी तळ उभारण्याची अमेरिकेची योजना होती. याद्वारे अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर स्वतःचा प्रभाव निर्माण करता आला असता, तसेच चीनवर कुरघोडी करता आली असती.

बांगलादेशमधील सत्तांतराला खरंच अमेरिका जबाबदार आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. दरम्यान, अमेरिकेने यावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. व्हाईट हाऊसचे (अमेरिकेच्या अध्यक्षांचं कार्यालय) माध्यम सचिव करिन जीन-पियरे यांनी म्हटलं आहे की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पदावरून हटवण्यात अमेरिकेची कोणतीही भूमिका नाही.

एका पत्रकार परिषदेत पियरे म्हणाले, बांगलादेशमधील सध्याच्या घटनांशी अमेरिकेचा संबंध असल्याच्या बातम्या चुकीच्या आहेत. या सर्व अफवा आहेत. बांगलादेशमधील लोकांनी बांगलादेशसाठी काही भूमिका घेतल्या असतील. आम्हालाही वाटतं की बांगलादेशमधील लोकांनीच त्यांच्या देशाचं भवितव्य निश्चित करावं. याबाबतीत आमच्यावर केले जाणारे आरोप चुकीचे आहेत. बांगलादेशमधील परिस्थिती व तिथल्या अराजकतेवर आमचं लक्ष आहे.

अमेरिकेचा सेंट मार्टिन बेटावर डोळा?

अमेरिकेला सेंट मार्टिन बेट हवं होतं, मात्र शेख हसीना यांनी ते दिलं नाही. त्यामुळे अमेरिकेने हसीना यांना सत्तेवरून हटवण्यासाठी वेगवेगळ्या राजकीय चाली खेळल्या आणि त्यात ते यशस्वी झाले, असं शेख हसीना यांनी त्यांच्या निकटवर्तीयांच्या माथ्यमातून पाठवलेल्या संदेशात म्हटलं होतं. इकोनॉमिक टाईम्सने हसीना यांचा हा संदेश प्रसिद्ध केला होतं.

हे ही वाचा >> उत्तर भारतात पूर आणि भूस्खलनाचा कहर; २८ जणांचा मृत्यू, दिल्लीमध्ये पावसाचा जोर वाढणार, हवामान विभागाचा इशारा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शिक्षण व सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये विद्यार्थी व तरुणांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. जवळपास दोन महिन्यांपासून हे आंदोलन चालू असून दोन आठवड्यांपूर्वी या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. आंदोलकांनी सरकारी मालमत्तेचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे. देशात अराजकता माजली आहे. परिणामी शेख हसीना यांनी ४ ऑगस्ट रोजी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आणि ५ ऑगस्ट रोजी त्या बांगलादेशी वायूदलाच्या एका विमानाने भारतात दाखल झाल्या. त्या भारतातून लंडनला जाणार आहेत.