अमेरिकेची अपेक्षा
पाकिस्तानने पठाणकोट हल्ला २६/११ इतकाच महत्त्वाचा समजून त्यातील गुन्हेगारांना शिक्षा करावी असे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी पाकिस्तानला असा इशारा दिला, की जैश ए महंमद, लष्कर ए तोयबा व डी कंपनी यांनी भारताविरोधात ज्या कारवाया केल्या आहेत, त्यातील संबंधितांना शिक्षा होण्याकरिता पाकिस्तानने प्रयत्न करणे गरजेचे आहे.
ओबामा-मोदी यांच्या भेटीनंतर संयुक्त निवेदनात म्हटले आहे, की पाकिस्तानने मुंबईतील २००८चा हल्ला, तर पठाणकोटमधील अलीकडचा हल्ला यात जबाबदार असणाऱ्या दहशतवाद्यांना शिक्षा करावी.
या बैठकीत मोदी व ओबामा यांनी मानवी संस्कृतीला दहशतवादाचा असलेला धोका कायम असल्याचे मान्य केले. त्यात पॅरिस ते पठाणकोट, ब्रसेल्स ते काबूल या हल्ल्यांचा या वेळी निषेध करण्यात आला. जगातील दहशतवाद्यांना होणारा अर्थपुरवठा व पायाभूत सुविधांचा मिळणारा लाभ बंद करण्याचा निश्चय करण्यात आला.
दाएश-आयसिस, अल कायदा, लष्कर ए तोयबा, डी कंपनी यांच्यावर कारवाईसाठी संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सहकार्याने एकजूट करण्याचे ठरवल्याचे ओबामा व मोदी यांनी स्पष्ट केले. अमेरिका-भारत यांच्यात दहशतवादविरोधी कार्यकारी गटाची पुढील बैठक होणार आहे त्या वेळी अधिकाऱ्यांनी कुठल्या बाबतीत सहकार्य करणे शक्य आहे याची तपासणी करावी असे आदेश दोन्ही नेत्यांनी त्यांच्या अधिकाऱ्यांना दिले. नागरी समुदाय व अल्पसंख्याक समाज यांना दहशतवादासारख्या प्रश्नावर व्यापक उपाययोजना करताना विश्वासात घ्यावे असे मत दोन्ही नेत्यांनी व्यक्त केले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2016 रोजी प्रकाशित
पठाणकोट हल्ल्यातील दहशतवाद्यांनाही पाकिस्तानने तातडीने शिक्षा करावी
पाकिस्तानने पठाणकोट हल्ला २६/११ इतकाच महत्त्वाचा समजून त्यातील गुन्हेगारांना शिक्षा करावी

First published on: 09-06-2016 at 01:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Us president barack obama asks pakistan to punish pathankot attack perpetrators