Donald Trump After Zohran Mamdani Victory: न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदी डेमोक्रॅट पक्षाचे नेते आणि भारतीय वंशाचे असलेले जोहरान ममदानी विजयी झाले आहेत. तसेच अमेरिकेतील व्हर्जिनिया, न्यूजर्सी या शहरांतही डेमोक्रॅटच्या उमेदवारांना आश्चर्यकारकरित्या यश मिळाले आहे. रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांचा पराभव होताच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रूथ या सोशल मीडिया साईटवर पराभवाचे कारण विशद करणारी पोस्ट शेअर केली आहे.

मंगळवारी रात्री उशीरा डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथवर एक पोस्ट शेअर केली. त्यात म्हटले, “ट्रम्प मतपत्रिकेवर नव्हते. तसेच शटडाऊनचा मुद्दा होता. यामुळे रिपब्लिकन्सचा काही ठिकाणी पराभव झाला. निवडणूक विश्लेषकांचे असे मत आहे.” दरम्यान ट्रम्प यांनी या पोस्टमध्ये कुणाचेही नाव घेतलेले नाही. पण अमेरिकेतील तीन मोठ्या शहरात रिपब्लिकन्सचा पराभव झाल्यानंतर ट्रम्प यांनी ही पोस्ट केली आहे.

ट्रम्प यांनी दिलेल्या कारणानुसार, “ते मतपत्रिकेवर नव्हते, याचा अर्थ ते स्वतः या निवडणुकीत उमेदवार नव्हते. त्यामुळे त्यांच्या लोकप्रियतेचा लाभ पक्षाला मिळाला नाही. तसेच शटडाउन म्हणजे सरकारी कामकाज ठप्प झाल्याचा फटका त्यांना बसला. कारण मतदार यामुळे नाराज होते.”

https://truthsocial.com/@realDonaldTrump/posts/115494873923565600

जोहरान ममदानी यांचा विजय

न्यूयॉर्क या अमेरिकेच्या ऐतिहासिक अशा शहरात डेमोक्रॅटिक पक्षाचे जोहरान ममदानी मोठ्या मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्रयू कुओमो, तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला.

मंगळवारी झालेल्या निवडणुकीत न्यूयॉर्कमधील मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडले होते. १९६९ नंतर पहिल्यांदाच शहरात २० लाख लोकांनी मतदान केले. जोहरान ममदानी यांना ९,४८,२०२ मते (५०.६ टक्के) मिळाली. अपक्ष उमेदवार अँड्रयू कुओमो यांना ७,७६,५४७ (४१.३ टक्के) आणि कर्टिस स्लिवा यांना १,३७,०३० इतके मतदान झाले.

जोहरान ममदानी यांनी अपक्ष उमेदवार आणि माजी गव्हर्नर अँड्रयू कुओमो, तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार कर्टिस स्लिवा यांचा पराभव केला. तर न्यूजर्सीमध्ये डेमोक्रॅटचे मिकी शेरिल हे गव्हर्नर म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी जॅक सियाटारेली यांचा पराभव केला. जॅक यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाठिंबा दिला होता. जॅक शेरिल निवडून आल्यामुळे न्यूजर्सीने डेमोक्रॅट्सना विजय मिळवून देण्याची हॅटट्रीक साधली आहे.

तर व्हर्जिनियामध्ये, डेमोक्रॅट्सचे नेते अबीगेल स्पॅनबर्गर यांनी गव्हर्नरपदाची निवडणूक जिंकली आहे. जानेवारी महिन्यात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सत्तेची सूत्र हाती घेतल्यापासून वर्षअखेरीस झालेल्या या निवडणुकीत त्यांना पहिला धक्का बसला आहे.