Donald Trump On Brics Extra Tariff : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. आतापर्यंत ट्रम्प यांनी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. यामध्ये टॅरिफ धोरणासह बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यांचा समावेश आहे. अनेक बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार केल्यानंतर ट्रम्प यांनी भारतासह जगभरातील अनेक देशांवर आयात शुल्काचं (टॅरिफ) हत्यार उगारलं होतं. खरं तर ट्रम्प यांच्या धोरणांची जगभरात चर्चा होते.
यातच काही दिवसांपूर्वी ट्रम्प प्रशासनाने धमकी दिली होती की रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांवर तब्बल ५०० टक्के आयातशुल्क आकारला जाईल. यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना मोठा इशारा दिला आहे. जो कोणता देश ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांबरोबर जाईल, त्या देशांवर १० टक्के अतिरिक्त आयातशुल्क लादलं जाईल, तसेच या धोरणाला कोणताही देश अपवाद असणार नाही, अशी इशारावजा धमकीच डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
दरम्यान, ब्रिक्स नेत्यांनी वाढत्या अमेरिकन आयातकरांवर टीका केल्यानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्सच्या अमेरिकाविरोधी धोरणांना पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रांवर अतिरिक्त १० टक्के कर लावण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. या बरोबरच दुसऱ्या एका पोस्टमध्ये ट्रम्प यांनी स्पष्ट केलं की अमेरिकन प्रशासन आज रात्रीपासून अनेक देशांना नवीन शुल्क नियम आणि सुधारित व्यापार करार अटींबाबत अधिकृत पत्रे पाठवण्यास सुरुवात करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
ब्रिक्स म्हणजे काय?
ब्रिक्स हा ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका हे देश एकत्र येऊन ‘ब्रिक’ नावाचे एक संघटन तयार करण्यात आले. २००१ मध्ये गोल्डमन सॅक्सचे विश्लेषक जिम ओ’नील यांनी ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचे वर्णन करण्यासाठी ब्रिक हा शब्द वापरला. या शब्दाचा स्वीकार करून पहिली ब्रिक शिखर परिषद १६ जून २००९ रोजी रशियातील येकातेरिनबर्ग येथे झाली. सर्वात वेगाने वाढणाऱ्या विकसनशील देशांना एकत्र आणण्यासाठी, त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पाश्चात्य शक्तींचे वर्चस्व असलेल्या आंतरराष्ट्रीय संस्थांचा सामना करण्यासाठी या गटाची स्थापना करण्यात आली होती. २०१० मध्ये या संघटनेत दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर संघटनेला ब्रिक्स असे नाव देण्यात आले.
दरम्यान, ब्रिक्समध्ये भारतही सहभागी आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स राष्ट्रांना दिलेल्या इशारा म्हणजे भारतालाही हा इशारा असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या या भूमिकेवर ब्रिक्स राष्ट्र काय भूमिका मांडतात? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रशियाबरोबर कोणत्याही देशांनी व्यापार न करण्याचाही दिला होता इशारा
गेल्या अनेक महिन्यांपासून रशिया व युक्रेनमध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. जगभरातील इतर देशांनी मध्यस्थी करूनही दोन्ही देश एकमेकांवरील हल्ले थांबविण्याचं नाव घेत नाहीये. विशेष बाब म्हणजे, रशियाने युक्रेनवरील हल्ले थांबवावे असं म्हणत ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी दोन्ही देशांमध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, रशियाने त्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवत युक्रेनवरील हल्ले सुरूच ठेवले होते. दरम्यान, युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाबरोबर कोणत्याही देशांनी व्यापार करू नये, असा सज्जड दम ट्रम्प यांनी जगभरातील अनेक देशांना दिला. तरीही, चीन व भारतासह बहुतांश देशांनी रशियामधून कच्चे तेल व ऊर्जा खरेदी करणे सुरूच ठेवले. त्यामुळे ट्रम्प यांना राग अनावर झाला असून त्यांनी रशियाबरोबर व्यापार करणाऱ्या देशांना धडा शिकविण्यासाठी नवीन विधेयक आणण्याची तयारी देखील केल्याचं बोललं जात आहे.