अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रविवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांना अपेक्षेप्रमाणे तालिबानसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. मात्र तालिबानबद्दलच्या एका प्रश्नावर त्यांनी अगदीच खोचक शब्दांमध्ये उत्तर दिल्याचं पहायला मिळालं. १६ ऑगस्ट रोजी तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर कब्जा मिळवल्यानंतर जगभरामध्ये यासंदर्भातील चर्चा आणि वृत्तांकन केलं जात असतानाच अमेरिकन राष्ट्राध्यक्ष वेळोवेळी आपली भूमिका स्पष्ट करताना दिसत आहेत. मागील आठवडाभरामध्ये अनेकदा बायडेन यांनी अफगाणिस्तानमधून लष्कर मागे बोलवण्याचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. मात्र आता बायडेन यांनी तालिबानवर विश्वास आहे की नाही याबद्दलही उत्तर दिलंय.
नक्की पाहा हे फोटो >> प्रेस कॉन्फरन्स झाली तालिबानची अन् ट्रोल होतायत मोदी; जाणून घ्या नक्की प्रकरण काय?
रविवारी पत्रकारांशी संवाद साधताना बायडेन यांना, तुम्हाला तालिबानवर आता विश्वास आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना अगदी खोचक शब्दांमध्ये बायडेन यांनी सुरुवात केली. “मला कोणावरही विश्वास नाही, अगदी तुमच्यावर (प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारावरही) नाही. माझं तुमच्यावर प्रेम आहे पण मी फारश्या लोकांवर विश्वास ठेवत नाही. तालिबानने आता काही ठोस निर्णय घेण्याची गरज आहे,” असं बायडेन म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी, “आतापर्यंत कोणत्याही गटाने अफगाणिस्तानच्या लोकांचं भलं व्हावं यासाठी प्रयत्न केले नाहीत. मात्र त्यांना तसं करायचं असल्यास बाहेरुन बरीच मदत लागेल. आर्थिक मदत, व्यापारासंदर्भातील मदत आता तालिबानला घ्यावी लागेल. तालिबानने दिलेला शब्द ते पाळतात की नाही हे आता बघायचं आहे. तसेच इतर देशांकडून त्यांना मान्यता मिळते की नाही याकडेही त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आतापर्यंत तालिबानने अमेरिकन लष्कराच्या तुकड्यांवर हल्ला केला नाहीय. त्यांनी आतापर्यंत अमेरिकेला तिथून लोकांची सुटका करण्यात अडथळे आणले नाहीयत. ते आता बोलतात त्याप्रमाणे वागतात का हे पुढील काळात समजेलच,” असं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> “तालिबान अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाही कारण त्यांना माहितीय, मोदीजी…”
“आपण आता अफगाणिस्तान सोडला नसता तर कधी सोडला असता? अजून दहा वर्षांनी, पाच वर्षांनी किंवा वर्षभराने. मी तुमच्या मुला-मुलींना अफगाणिस्तानमध्ये युद्ध करण्यासाठी पाठवू इच्छित नाही. हे आपल्या हिताच्या दृष्टीने योग्य आहे. तुम्ही बिजिंगमध्ये आणि मॉस्कोमध्ये बसून आम्ही अफगाणिस्तान सोडल्याने आनंदी असाल तर आम्हालाही या निर्णयाचा आनंदच वाटतोय,” असंही बायडेन यावेळेस म्हणाले.
#WATCH | “I don’t trust anybody, including you, I love you but there is not a lot of people I trust. Taliban has to make a fundamental decision,” says US President Joe Biden on being asked –do you trust them (Taliban) now? pic.twitter.com/LDREjZm5Yn
— ANI (@ANI) August 23, 2021
काबूलमधून लोकांना यशस्वीपणे बाहेर नेण्यात येत असले तरी अशा मोहिमांत काही प्रमाणात गडबड गोंधळात प्राणहानी होऊ शकते. त्याचा प्रत्यय पहिल्या काही दिवसांतच काही लोक विमानाच्या पंख्याला लटकून खाली पडल्याने सहा जण मरण पावल्याच्या घटनेतून आला आहे. या मोहिमांमध्ये जोखीम असते कारण प्रत्येकालाच सुरक्षित ठिकाणी परतण्याची घाई असते. असे असले तरी अमेरिका व मित्र देशांचे लोक तसेच अफगाणिस्तानचे काही नागरिक यांना सुरक्षितपणे माघारी आणण्यात आम्ही वचनबद्ध आहोत असे बायडेन यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं आहे.
नक्की वाचा >> “तालिबानची सत्ता असणाऱ्या अफगाणिस्तानमध्ये जा तिथे पेट्रोलचे दर कमी आहेत”; इंधनदरांवरील प्रश्नावर भाजपा नेत्याचं उत्तर
जास्तीत जास्त लोकांना ३१ ऑगस्टच्या मुदतीच्या आधी माघारी आणण्याचे आमचे प्रयत्न राहतील, असं बायडेन म्हणाले आहेत. शुक्रवारी व्हाइट हाऊसमधून केलेल्या भाषणात त्यांनी सांगितले की, अमेरिकेने जुलैपासून १८ हजार लोकांना परत आणले असून शनिवारी १३ हजार लोकांना परत आणले आहे. अफगाणिस्तानातून सैन्य माघारीच्या निर्णयाचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, अमेरिकेने लोकांना तेथून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. अतिशय अवघड अशी ही हवाई मोहीम होती.
नक्की वाचा >> नागपूरमधून अफगाणिस्तानला डिपोर्ट करण्यात आलेला ‘तो’ तरुण झाला तालिबानी दहशतवादी?
हवाई मार्गाने लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याची एवढी मोठी शक्ती फक्त अमेरिकेकडे आहे. ज्या अमेरिकनांना मायदेशी परतण्याची इच्छा आहे त्यांच्यापैकी प्रत्येकाला मायदेशी आणले जाईल. अमेरिकी लोकांना हलवण्यास प्राधान्य देण्यात येणार असून अफगाण व मित्र देशांच्या ५०-६५ हजार जणांना हलवण्यात येणार आहे. ही मदत योजना जोखमीची आहे. त्यात सैन्यालाही धोका आहे. अवघड परिस्थितीत ते काम करीत आहेत.