परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांचे प्रतिपादन

वॉशिंग्टन : भारत व अमेरिका यांच्यात व्यापार व आर्थिक यासह अनेक परस्पर हिताचे मुद्दे असून अनेक मूल्येही समान आहेत. अलीकडच्या भारत भेटीत आपण प्रादेशिक सुरक्षा व हवामान बदल यासह अनेक क्षेत्रातील सहकार्याबाबत चर्चा केली, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री टोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे.

परराष्ट्र खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ब्लिंकन हे २७ जुलैला भारताच्या दौऱ्यावर गेले होते त्यात त्यांच्या चर्चेची व्याप्ती मोठी होती. त्यांची ही पहिलीच भारत भेट होती त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी २८ जुलैला चर्चा केली तसेच त्यांचे समपदस्थ जयशंकर व राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याशीही चर्चा केली.

परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते नेड प्राइस यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, परराष्ट्र मंत्री ब्लिंकन यांनी भारताला प्रथमच भेट दिली. त्यात त्यांनी दोन्ही देशांतील संबंध त्याचबरोबर जागतिक पातळीवर दोन्ही देशांची सामरिक भागीदारी यावर चर्चा केली. दोन्ही देशात परस्पर सहकार्याचे अनेक घटक व मूल्ये आहेत. त्यांनी व्यापार व आर्थिक संबंधाबाबत विशेषत्वाने चर्चा केली. हवामान बदल व प्रादेशिक सुरक्षा हेही त्यांच्या चर्चेचे विषय होते. क्वाड गटात भारत बजावत असलेली भूमिका, कोविड १९ साथीच्या काळातील सहकार्य यावरही चर्चा झाली तसेच कोविड प्रतिबंधक लशीचे उत्पादन वाढवण्याच्या आवश्यकतेवर भर देण्यात आला. दोन्ही देशातील वरिष्ठ नेत्यांच्या पातळीवर या वर्षांच्या उत्तरार्धात क्वाड शिखर बैठक घेण्याची अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांची इच्छा आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.