Tariff Case Begins In US Court: काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील स्थानिक न्यायालयाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना परदेशी आयातीवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ लादण्याचा अधिकार नाही, असा निर्णय दिला होता. आता या निर्णयाविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या याचिकेत, ट्रम्प यांनी भारतावर मोठ्या प्रमाणात लादलेल्या टॅरिफचे समर्थन केले आणि म्हटले की, रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा हा एक महत्त्वाचा भाग होता.
या याचिकेत असे म्हटले आहे की, “रशिया आणि युक्रेन यांच्यातील सुरू असलेल्या युद्धाला तोंड देण्यासाठी, याचबरोबर इतर युद्धग्रस्त देशांत शांतता प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणून, राष्ट्राध्यक्षांनी अलीकडेच रशियन ऊर्जा उत्पादने खरेदी करत असल्याबद्दल भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्यास मान्यता दिली होती.”
“स्थानिक न्यायालयाने टॅरिफविरोधी निर्णय देताना असा प्रश्न उपस्थित केला नाही की, या संकटांमुळे “राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र धोरण किंवा अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला” धोके निर्माण होतात, ज्यामुळे राष्ट्राध्यक्षांना आपत्कालीन निर्णय घेण्यासाठी पुरेसे अधिकार आहेत”, असेही याचिकेत म्हटले आहे.
या याचिकेत पुढे असेही स्पष्ट केले आहे की, “स्थानिक न्यायालयाच्या या निर्णयामुळे गेल्या पाच महिन्यांपासून टॅरिफच्या माध्यमातून सुरू असलेल्या परराष्ट्र वाटाघाटींवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे, ज्यामुळे आधीच केलेल्या करारांना आणि चालू वाटाघाटींना धोका निर्माण झाला आहे.”
हे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे की, जर अमेरिकन सरकार हा खटला हरले तर त्यांना युरोपियन युनियन, जपान आणि दक्षिण कोरियासह इतर देशांशी केलेले व्यापार करार रद्द करावे लागतील. याचबरोबर अमेरिकेला खूप नुकसान सहन करावे लागेल.
“आम्ही युरोपियन युनियनशी एक करार केला आहे. या कराराद्वारे ते अमेरिकेला जवळजवळ एक ट्रिलियन डॉलर्स देण्यास तयार आहेत. आणि तुम्हाला माहिती आहे काय? ते आनंदी आहेत. पण, खटला विरोधात गेला तर ते सर्व करार रद्द करावे लागतील”, असे ट्रम्प यापूर्वी म्हणाले होते.
ट्रम्प पुढे असेही म्हणाले होते की, “या करारांद्वारे आपल्या देशाला पुन्हा श्रीमंत होण्याची संधी आहे. पण अमेरिका पुन्हा गरीब देखील होऊ शकते. जर हा खटला जिंकला नाही, तर आपल्या देशाला खूप मोठे नुकसान सहन करावे लागेल.”