US Tariffs On India: भारतावर आधीच २५ टक्के टॅरिफ लादलेल्या अमेरिकेने तो आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे. बुधवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लादला, जो २७ ऑगस्टपासून लागू होऊ शकतो. दरम्यान, ट्रम्प याचे कारण भारताचे रशियाकडून तेल खरेदी करणे असल्याचे सांगत आहेत. दुसरीकडे, तज्ज्ञांचे मत आहे की, ट्रम्प भारतावरील टॅरिफ वाढवण्यामागे भारत आणि पाकिस्तानमधील शस्त्रविराम असू शकतो.

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना, विल्सन सेंटरमधील साउथ एशिया इन्स्टिट्यूटचे संचालक मायकेल कुगेलमन म्हणाले, “दुर्दैवाने, गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता ही भारतावर अतिरिक्त टॅरिफ लादण्याची नवीन घोषणा अजिबात आश्चर्यकारक नाही. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प देखील टॅरिफ लादण्यास पूर्णपणे वचनबद्ध असल्याचे दिसून येते. भारत-अमेरिका संबंधांवर संभाव्य हानिकारक परिणाम होण्याची शक्यता असूनही, ट्रम्प यांनी त्यांच्या धमकीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला हे माझ्यासाठी आश्चर्यकारक नाही.”

ट्रम्प यांची चीनला वेगळी वागणूक

भारत आणि चीन हे दोन्ही देश रशियाकडून तेल खरेदी करत आहेत. तरीही ट्रम्प फक्त भारताला का लक्ष्य करत आहेत, असे विचारले असता, कुगेलमन म्हणाले, “शस्त्रविरामातील भूमिकेचे श्रेय चीनने राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना उघडपणे नाकारले नाही. चीनच्या कोणत्याही नेत्याने ट्रम्प यांच्याशी दीर्घकाळ फोनवरून चर्चा केली नाही आणि त्यांना काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, हे सांगितले नाही.”

हा खरं तर ढोंगीपणा

“भारताच्या बाबतीत हे घडले आहे. त्यामुळे मला वाटते की कदाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व्यापार आणि टॅरिफद्वारे भारत आणि भारत सरकारवर आपला राग काढत असतील. हा खरं तर दुटप्पीपणा, ढोंगीपणा आहे किंवा तुम्ही त्याला काहीही म्हणू शकता”, असे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, तिसरा देश…

ऑपरेशन सिंदूरनंतर, पाकिस्तानने भारतावर हल्ले करण्याचे अयशस्वी प्रयत्न केले होते. पण नंतर दोन्ही देशांनी शस्त्रविरामाची घोषणा केली. आता ट्रम्प दावा करत आहेत की, त्यांनीच भारत-पाकिस्तान यांच्यातील शस्त्रविराम घडवून आणला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारमधील अनेक मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे की यामध्ये कोणताही तृतीय पक्ष सहभागी नव्हता.