Pakistan To Get Air-to-Air Missiles From US: गेल्या काही महिन्यांत भारताचे अमेरिका आणि पाकिस्तानबरोबरचे संबंध ताणलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे पाकिस्तान आणि अमेरिकेत जवळीक वाढत असल्याचे दिसत आहे. अशात, आता पाकिस्तान आणि अमेरिका यांच्यात एक सुरक्षा करार झाला आहे. या कराराच्या माध्यमातून अमेरिका पाकिस्तानला AIM-120 प्रगत मध्यम-श्रेणीची हवेतून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे पुरवणार आहे. याबाबत अमेरिकेच्या युद्ध विभागाने एका अधिकृत निवेदनात माहिती दिली आहे.
अमेरिकेच्या युद्ध विभागाने अधिसूचित केलेल्या नव्याने सुधारित शस्त्रास्त्र करारात रेथिऑन कंपनीने बनवलेल्या क्षेपणास्त्र प्रणालीच्या परदेशी खरेदीदारांमध्ये पाकिस्तानचाही समावेश होता. मात्र, पाकिस्तानला किती क्षेपणास्त्रे पुरवण्यात येणार आहेत, याची नेमकी संख्या निवेदनात नमूद केलेली नाही.
या करारात ब्रिटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जपान आणि सौदी अरेबियासह इतर अनेक देशांचाही समावेश आहे. कराराअंतर्गत या देशांना मे २०३० पर्यंत क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यात येणार आहे.
पाकिस्तान-अमेरिकेतील संबंधांमध्ये गेल्या काही महिन्यांत मोठी सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या महिन्यात वॉशिंग्टन डी.सी.मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि त्यांचे लष्करप्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीर यांची भेट घेतली होती. त्यापूर्वी, असीम मुनीर यांनी जूनमध्येही ओव्हल ऑफिसमध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची वैयक्तिक भेट घेतली होती.
जुलैमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल झहीर अहमद बाबर यांनीही अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाला भेट दिली होती. दरम्यान, मे महिन्यात झालेल्या भारत-पाकिस्तान संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंध आणखी सुधारले आहेत.
या लष्करी संघर्षानंतर पाकिस्तानने डोनाल्ड ट्रम्प यांना शस्त्रबंदीसाठी मदत केल्याचे श्रेय दिले आणि नोबेल शांतता पुरस्कारासाठी त्यांचे नाव सुचवले होते. दरम्यान, भारताने हा दावा फेटाळून लावला आणि म्हटले की, दोन्ही बाजूंच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये झालेल्या थेट चर्चेनंतर शस्त्रबंदी झाली.
बांगलादेश २० लढाऊ विमान खरेदी करणार
दरम्यान, मंगळवारी एका मीडिया रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, बांगलादेश चिनी बनावटीची २० लढाऊ विमाने खरेदी करण्याची योजना आखत आहे. सरकारी कागदपत्रांचा हवाला देत ‘द बिझनेस स्टँडर्ड’ वृत्तपत्राने बातमी दिली आहे की, या करारात प्रशिक्षण, देखभाल आणि इतर संबंधित खर्चाचाही समावेश असेल. वृत्तानुसार, बांगलादेश हवाई दलाचे आधुनिकीकरण आणि राष्ट्रीय हवाई संरक्षण मजबूत करण्यासाठी बांगलादेशला २०२६ ते २०२७ दरम्यान ही लढाऊ विमाने मिळतील.