रशिया-युक्रेन युद्ध हे मोदींचे युद्ध अशी मुक्ताफळे उधळल्यानंतर ‘व्हाइट हाउस’चे व्यापार सल्लागार पीटर नव्हारो यांनी भारतावरील टीका सुरूच ठेवली आहे. रशियातून कच्चे तेल आयात करून त्यावर प्रक्रिया करून ते आंतरराष्ट्रीय बाजारात विकण्याचा संदर्भ देऊन त्यांनी भारत हा रशियासाठी तेलातून मिळणाऱ्या पैशांसाठीचे धुण्याचे मशीन (ऑइल मनी लाँड्रोमॅट) आहे, अशी टीका केली.

भारतावर टीका करताना त्यांनी ‘एक्स’वर अनेक संदेश प्रसृत केले. पंतप्रधान मोदींचे ध्यानावस्थेत बसलेले छायाचित्रही टाकले. अतिशय संतापजनक शब्दांत टीका करताना नव्हारो म्हणाले, ‘रशियाकडून शस्त्रे विकत घेऊन, अमेरिकेच्या कंपन्यांकडे संवेदनशील लष्करी तंत्रज्ञानाचे हस्तांतर करून भारतामध्ये कारखाने उभे करावेत, अशी मागणी करणे म्हणजे ‘सामरिक फुकट खाणे’(स्ट्रॅटेजिक फ्रीलोडिंग) आहे.’ त्यांच्या टिप्पण्यांवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून, अमेरिकेच्या दुटप्पीपणावरही बोट ठेवले आहे.नव्हारो म्हणाले, ‘भारत जर जगातील सर्वांत मोठी लोकशाही असेल आणि अमेरिकेचा सामरिक भागीदार म्हणून अमेरिकेचे अपेक्षित वर्तन हवे असेल, तर भारताने तसे वागायला हवे. भारताची तेल कंपन्यांच्या मोठ्या लॉबीने जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीचे रूपांतर मोठ्या अशा तेलावर प्रक्रिया करणाऱ्या ‘हब’मध्ये आणि रशियासाठी तेलातून पैसे कमाविणाऱ्या धुण्याच्या मशीनमध्ये केली आहे. भारतातील तेलावर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्या रशियातून स्वस्त कच्चे तेल खरेदी करतात आणि त्यावर प्रक्रिया करून युरोप, आफ्रिका, आशियातील इतर देशांना विकतात.’

‘भारत सध्या प्रतिदिन १० लाख बॅरल प्रक्रिया केलेले पेट्रोलियम उत्पादने निर्यात करतो. रशियातून आयात केल्यापेक्षा हा आकडा निम्म्याने अधिक आहे. हे सगळे भारतातील राजकीय जवळीक असणाऱ्या ऊर्जा क्षेत्रांतील बड्यांकडे आणि थेट पुतिन यांच्या युद्धखोरीकडे जाते. युक्रेन युद्ध सुरू होण्यापूर्वी भारत रशियाकडून एक टक्क्याहून अधिक कमी तेल आयात करीत होता. आज तो आकडा ३० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. स्थानिक मागणीमुळे हा आकडा वाढलेला नाही. भारतातील नफेखोरी करणाऱ्यांमुळे तो वाढला असून, युक्रेनमधील रक्ताचे डाग त्यावर लागले आहेत. अमेरिकी ग्राहक भारतीय उत्पादने वापरतात. पण, भारत अमेरिकेच्या निर्यातीवर मोठा कर लावून अमेरिकी उत्पादने लांब ठेवतो.’नव्हारो म्हणाले, ‘भारताबरोबर अमेरिकेची व्यापारतूट ५० अब्ज डॉलरची आहे. भारत अमेरिकी डॉलरचा उपयोग रशियाचे तेल खरेदी करण्यासाठी करतो. त्यांच्यामुळे युक्रेनमधील नागरिक मरत आहेत. हे इथेच थांबत नाही. भारत रशियातून शस्त्रखरेदीही करतो. असे करताना अमेरिकी कंपन्यांकडे संवेदनशील लष्करी तंत्रज्ञानाच्या हस्तांतराची आणि भारतात संरक्षण साहित्याचे उत्पादन करावे, अशी मागणी करतो. हे म्हणजे ‘सामरिकदृष्ट्या फुकटचे खाणे’ आहे. बायडेन प्रशासनाने या वेडेपणाकडे इतर मार्गाने पाहिले. ट्रम्प त्याचा सामना करीत आहेत.’

विरोधी पक्षांची टीकाअमेरिकेतील विरोधी पक्षांनी ट्रम्प यांच्यावर भारताबाबत पक्षपाती धोरण अवलंबल्याची टीका केली आहे. चीन रशियातून तेल आयात करीत असताना भारतावरच फक्त कर लावण्यावरून विरोधी पक्षांनी टीका केली आहे.