दक्षिण आफ्रिकेतील देशांमधून होणाऱ्या विमानसेवेवर निर्बंध लादण्याआधी नव्या करोना विषाणूची तपशीलवार माहिती आवश्यक असल्याचं मत अमेरिकेचे मुख्य वैद्यकीय सल्लागार अँथनी फौची यांनी व्यक्त केलंय. त्यामुळे जगभरात नव्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काळजीचं वातावरण असलं तरी अमेरिका सध्या तरी सावध भूमिका घेताना दिसत आहे. अद्याप अमेरिकेत या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलेलं नाही. ते सीएनएन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

फौची म्हणाले, “आम्हाला नव्या करोना विषाणूबाबत अधिक तपशील मिळतील तसे आम्ही यावर तातडीने निर्णय घेऊ. अशा गोष्टींवर चर्चा केली जाते. मात्र, शास्त्रीय कारणं समोर येईपर्यंत आम्ही काही निर्णय घेतोय असं म्हणता येत नाही. हा नवा करोना विषाणू अमेरिकेत अस्तित्वात असल्याचा कोणताही पुरावा नाही. या विषाणूच्या रचनेत बदल झाले आहेत. त्यामुळे काळजी व्यक्त केली जात आहे. तसेच रोगप्रतिकारक शक्तीला भेदण्याचा धोका आणि संसर्ग वाढण्याबाबत भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, हे सर्व वैद्यकीय चाचण्यांनंतरच स्पष्ट होईल.”

हेही वाचा : करोनाच्या नव्या विषाणूसमोर सध्याची रोगप्रतिकारक शक्तीही निष्प्रभ? एम्सनं दिला गंभीर इशारा!

दक्षिण आफ्रिकेत करोनाचा ओमिक्रोन हा नवा विषाणू सापडल्यानंतर ब्रिटन आणि युरोपीयन संघाने दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर निर्बंध घातलेत. अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी देखील दक्षिण आफ्रिकेतील आपल्या समकक्ष शास्त्रज्ञांशी या विषयावर बैठक घेतली. यात दक्षिण आफ्रिकेत नेमकी काय स्थिती आहे यावर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, करोनाचा नवा व्हेरिएंट जगभरात हातपाय पसरतो आहे. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोटस्वानानंतर आता करोनाचा B.1.1529 हा व्हेरिएंट इस्राईलपर्यंत पोहचला आहे. इस्राईलच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात संसर्गाला कारणीभूत ठरलेला अधिक धोकादायक करोना व्हेरिएंट इस्राईलमध्ये सापडला आहे. इस्राईलमध्ये नव्या विषाणूचा संसर्ग झालेला रूग्ण मलावीमधून परतला होता.

इस्राईलमध्ये मलावीशिवाय इतर देशांमधून परतलेल्या अन्य २ प्रवाशांमध्ये देखील या नव्या व्हेरिएंटचा संसर्ग आढळला आहे. त्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.

इस्त्रायलमध्ये लसीकरण झाल्यानंतरही करोनाची लागण

विशेष म्हणजे इस्राईलमध्ये संसर्ग झालेले तीनही रूग्णांचं लसीकरण झालेलं होतं. यानंतरही नव्या करोना व्हेरिएंटचा संसर्ग झालाय. त्यामुळे या व्हेरिएंटने इस्राईलसह जगभरातील आरोग्य यंत्रणेची काळजी वाढवलीय. असं असलं तरी इस्राईलमधील या संसर्गित रूग्णांचे लसीकरणाचे किती डोस झाले होते याची स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

डेल्टा व्हेरिएंटच्या तुलनेत अनेक पटीने घातक विषाणू

याआधी जगभरात धोकादायक समजल्या गेलेल्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा अनेक पटीने हा नवा व्हेरिएंट घातक असल्याचं समोर येतंय. डेल्टा व्हेरिएंटमध्ये दोन म्युटेशन झाले होते. मात्र, या व्हेरिएंटमध्ये तब्बल १० म्युटेशन झालेले आहे. त्यामुळे याची संसर्ग क्षमता वाढली आहे.

दक्षिण आफ्रिकेत सापडला करोनाचा डेल्टापेक्षाही भयानक व्हेरिएंट

दक्षिण आफ्रिकेत करोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. हा व्हेरिएंट डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही भयानक असल्याने आता जगभरातच चिंतेचं वातावरण आहे. त्यामुळे आता भारताला आणि भारतीयांनाही विशेष काळजी घेणं आवश्यक आहे.