२०१४ मधील लोकसभा निवडणुकीपासून एका मागून एक निवडणुकीत पराभवाचा झटका बसत असलेल्या काँग्रेससाठी पुढीलवर्षी उत्तर प्रदेशमध्ये होणारी विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. या निवडणुकीच्या तयारीला आतापासूनच काँग्रेसने सुरुवात केली असून, प्रमुख प्रतिस्पर्धी भाजपला या निवडणुकीत कशी टक्कर देता येईल, यासाठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यामध्ये काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमधील मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर होण्याची शक्यता असून, मिळालेल्या माहितीनुसार तो ब्राह्मण समाजातील नेता असण्याची शक्यता आहे.
दरम्यान, निवडणूक व्यवस्थापनासाठी प्रख्यात असलेले प्रशांत किशोर यांनी गांधी घराण्यातीलच प्रियांका किंवा राहुल यांनीच या निवडणुकीत पक्षाचे नेतृत्त्व करावे, असा सल्ला दिला असल्याचे समजते. प्रियांका किंवा राहुल यांनी या निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व केले तर नक्कीच निकाल वेगळे असतील, असे काँग्रेसमधील एका गटालाही वाटते आहे.
जर प्रियांका किंवा राहुल गांधी यांनी या निवडणुकीचे नेतृत्त्व करण्यास नकार दिला, तर ब्राह्मण समाजातील एखाद्या नेत्याला नेतृत्त्व करण्याची संधी द्यावी, असे मत प्रशांत किशोर यांनी मांडले आहे. अर्थात याबाबत काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या १९ मे रोजी पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू आणि पुद्दूचेरी येथील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहेत. त्यानंतरच पक्ष उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार असून, त्यावेळीच कोण या निवडणुकीचे नेतृत्त्व करेल, हे स्पष्ट होईल.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशमधील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, काँग्रेसच्या विधीमंडळ पक्षाचे नेते आणि पक्षाची राज्यातील जबाबदारी सांभाळणारे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीमधील सदस्य या सर्वांच्याच जबाबदाऱ्या बदलण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 2nd May 2016 रोजी प्रकाशित
उत्तर प्रदेशमध्ये कोण करणार काँग्रेसचे नेतृत्त्व; ब्राह्मण उमेदवार की गांधी परिवार?
प्रियांका किंवा राहुल यांनीच नेतृत्त्व करावे, प्रशांत किशोर यांचा सल्ला
Written by वृत्तसंस्था
Updated:

First published on: 02-05-2016 at 13:54 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh election 2017 who will lead congress party