लोकसभेत वंदे मातरम आम्ही म्हणणार नाही ते इस्लाम विरोधी आहे असा दावा समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर्र रहमान बर्क यांनी केला आहे. ते उत्तर प्रदेशातल्या संभल या ठिकाणाहून निवडून आले आहेत. वंदे मातरमच्या घोषणा लोकसभेत दिल्या जात आहेत. वंदे मातरम मी अजिबात म्हणणार नाही. कारण ते इस्लामविरोधी आहे असे बर्क यांनी सुनावले आहे. खासदार शफिकुर्ररहमान बर्क यांनी लोकसभेत सदस्यत्त्वाची शपथ घेतली त्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मोदी सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन संसदेत सुरू झालं आहे. या अधिवेशनादरम्यान सगळ्या खासदारांना सदस्यत्त्वाची शपथ दिली जाते आहे. समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर्र रहमान बर्क  यांनी सदस्यत्त्वाची शपथ घेतली. ज्यानंतर मी भारतीय घटनेचा आदर करतो. मात्र वंदे मातरमच्या घोषणा दिल्या जात आहेत ते मला मान्य नाही. वंदे मातरम इस्लाम विरोधात आहे ते म्हणण्याचा प्रश्नच येत नाही असे निक्षून सांगितले.

सोमवारीच महाराष्ट्रातील अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी जय श्रीरामच्या घोषणा संसदेत दिल्या जाऊ नयेत अशी मागणी केली होती. आम्ही सदस्यत्त्वाची शपथ घेत असताना काही लोक जय श्रीरामचे नारे देत होते. ही बाब योग्य नाही असे नवनीत कौर राणा यांनी म्हटले होते. त्यानंतर आज समाजवादी पक्षाचे खासदार शफिकुर्र रहमान बर्क यांनी वंदे मातरम इस्लाम विरोधी असल्याचे म्हटले आहे.