बोटावरील शाई दाखवा, सवलत मिळवा
पुणे : लोकशाहीतील सर्वात महत्त्वाचा दिवस हा निवडणुकीचा आणि नागरिकांचे आद्य कर्तव्य म्हणजे मतदान हे समीकरण कितीही रूढ असले तरी कधी ‘माझ्या एका मताने काय फरक पडणार’ या विचारातून, कधी आळस म्हणून तर कधी मतदानासाठी मिळालेली सुट्टी साजरी करण्यासाठी बाहेरगावी जाऊन मतदानाला न जाण्याचा कल दिसतो. अशा मतदारांना आकर्षित करण्यासाठी शहरातील अनेक व्यापारी, उद्योजक, डॉक्टर, रेस्टॉरंट चालकांनी पुढाकार घेतला आहे.
एका मिसळीवर एक मिसळ फ्री, रेस्टॉरंटमधील जेवणाच्या बिलावर पन्नास टक्केपर्यंत सूट अशा सवलतींबरोबर आरोग्यदायी तपासण्या आणि उपचार पद्धतींसारख्या कल्पक योजना राबवून मतदारांना मत देण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे. गोखलेनगर येथील ‘आकांक्षा फाउंडेशन’ तर्फे मंगळवारी (२३ एप्रिल) सकाळी सात ते संध्याकाळी सहा या वेळेत मतदान केल्याची शाई दाखवलेल्या नागरिकांची मोफत रक्तगट आणि मधुमेह तपासणी करण्यात येणार आहे.
‘अग्रज’ चे बाळकृष्ण थत्ते म्हणाले, मतदान केल्याची शाई दाखवणाऱ्या ग्राहकांना अग्रजच्या पिठांवर दहा टक्के सवलत देत आहोत. ग्राहकांनी निवडणुकीच्या दिवशी मतदानासाठी बाहेर पडावे, मत कोणाला द्यावे हा वैयक्तिक निर्णय आहे. मात्र ते द्यावे म्हणून ही सवलत देत आहोत.
‘सुश्रुता वेलनेस आयुर्वेदिक केंद्रा’च्या डॉ. सुजाता पवार म्हणाल्या, विविध विकार, ताणतणाव, मानसिक शांतता यांवर उपचार करणारी आयुर्वेदातील शिरोधारा ही उपचार पद्धती दोन मे ते पंचवीस मे या कालावधीत विनामूल्य देण्यात येणार आहे.
‘सेरानो रिसॉर्ट्स’च्या श्वेता जैन म्हणाल्या, मुळशीजवळ वसलेल्या आमच्या रिसॉर्टवर सुटीसाठी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांनी मतदान केल्याची खूण दाखवल्यास सत्तावीस एप्रिलपर्यंत वीस टक्के सूट देण्यात येणार आहे.
‘थर्टी टू व्हाईट्स’ या दातांच्या दवाखान्यात उपचारांसाठी येणाऱ्या, मतदान केलेल्या रुग्णांना मोफत चेकअप आणि उपचार मिळणार आहेत. डॉ. तन्वी काळे म्हणाल्या, मतदान करण्यासाठी सुशिक्षित नागरिक पुढे येत नाहीत, हे चित्र बदलण्यासाठी ही सवलत देत आहोत.
समाज माध्यमांतील ‘पुणे लेडिज’ समूहाच्या सोनिया अगरवाल कोंजेटी म्हणाल्या, महिला उद्योजक, डॉक्टर, व्यावसायिक यांना त्यांचे काम लोकांसमोर मांडता यावे तसेच मतदारांना मत देण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी समाजमाध्यमांवर चळवळ सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून मतदार आणि महिला या सर्वाना योग्य प्रोत्साहन मिळावे हा विचार आहे.