वरूण धवन आणि अनुष्का शर्मा आपल्या सुईधागा- मेड इन इंडिया या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या माध्यमातून भारतीय उद्योजक आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ, कलाकार आणि विणकरांना सलाम करत आहेत. वरुण यामध्ये मौजी नावाच्या टेलरची भूमिका करत असून अनुष्का त्याची पत्नी आणि एम्ब्रॉयडर ममताच्या भूमिकेत आहे. निरागस अएसलेल्या या जोडप्याने मोठे नाव कमावण्याचे स्वप्न पाहिले आहे. एक चांगला विषय घेऊन चित्रपट निर्मिती करत असल्याच्या निमित्ताने स्किल इंडियाच्या मोहिमेचा प्रसार करण्यासाठी सुईधागाच्या कलाकारांना नेमण्यात आले आहे. त्यामुळे सरकारच्या मोहीमेचा प्रचार होण्याचे काम सोपे होईल. या चित्रपटातून भारतातील तळागाळातील अत्यंत बुद्धिमान कारागीर आणि कौशल्यपूर्ण कामगारांच्या क्षमतांवर आणि त्यांच्यासमोरील आव्हाने तसेच समस्यांवर भर देण्यात आला आहे. वरूण आणि अनुष्का हे या चित्रपटातील प्रमुख कलाकार असून त्यांनी स्किल इंडियासोबत भागीदारी केली आहे. भारताच्या कौशल्यपूर्ण बुद्धिमत्तेला चालना देण्यासाठी तसेच या कलाकारांच्या कामाचा प्रसार करण्यासाठी भारतातील विविध भागांमध्ये त्यांच्यासोबत हे दोघेही सहभागी होतील.

या भागीदारीबाबत पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले, वरूण धवन आणि अनुष्का शर्मा यांनी सुईधागा-मेड इन इंडिया या खास चित्रपटाद्वारे आपल्या देशातील कारागीर आणि कलाकारांच्या समाजाची कौशल्ये आणि बुद्धिमत्ता लोकांसमोर आणली आहे. त्यांच्यासारखे कलाकार महत्त्वाचा सामाजिक संदेश देणारे चित्रपट बनवतात ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. भारत हा जगातील सर्वाधिक तरुण देशांपैकी एक आहे आणि इतके मेहनती आणि उत्साही कौशल्यपूर्ण तसेच उद्योजकतेची कौशल्ये असलेले तरूण आपल्या कामाद्वारे देशाला नाव आणि प्रतिष्ठा मिळवून देत आहेत. या दोन्ही कलाकारांनी या कामाचा पुरस्कार केल्याने तरूणांना कौशल्य प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. यातूनच नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील न्यू इंडियाच्या उभारणीसाठी मदत होईल.

कौशल्य विकास आणि उद्योजकता (एमएसडीई) मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली चालवल्या जाणाऱ्या स्किल इंडियाचे उद्दिष्ट व्यावसायिक प्रशिक्षणाचा दर्जा वाढवणे हे आहे. त्यात नवीन युगाची आणि पारंपरिक कौशल्ये समाविष्ट आहेत. अद्ययावत साधनसुविधांच्या निर्मितीत मदत, तरूणांना अधिक रोजगारक्षम बनवण्यासाठी तांत्रिक सहकार्य आणि त्यासाठी उद्योगांची भागीदारी आणि देशातील तरूणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे या गोष्टी या माध्यमातून साध्य केल्या जाणार आहेत. त्यामुळे दरवर्षी १० कोटींपेक्षा अधिक तरूण स्किल इंडियामध्ये सहभागी होतात आणि चांगल्या राहणीमानाच्या माध्यमातून आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतात.

याबाबत वरुण म्हणाला, पंतप्रधान मोदी यांनी आमचे कारागीर, कलाकार आणि तत्सम कामगारांना संघटित करणे, कौशल्य देणे, प्रशिक्षण तसेच वित्तीय सहकार्य आणि पाठिंबा देत असताना अभूतपूर्व दूरदर्शिता दाखवली आहे. आम्हाला या मोहिमेचा प्रसार करताना अभिमान वाटत असून आमचा सुई धागा हा चित्रपट त्याच्या अत्यंत जवळ जाणारा आहे आणि तो स्वयंपूर्णता आणि उद्योजकता यांना प्रोत्साहन देतो. तर अनुष्का म्हणाली, स्किल इंडिया मोहीम सरकारच्या देशातील कौशल्यपूर्ण मनुष्यबळाला सहभागी करून सहकार्य करण्याच्या हेतूने प्रेरित आहे. सुईधागाची निर्मिती करत असताना, स्वतःची बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची संधी न मिळालेल्या अत्यंत बुद्धिमान, कौशल्यपूर्ण कारागीरांच्या आणि कलाकारांच्या कथा समोर आल्या.