राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी सोहळा बुधवारी (२२ जुलै) पार पडला. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी सदस्यत्वाची शपथ दिली. यावेळी भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही शपथ घेतली. मात्र, शपथ घेतल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ घोषणा दिली. त्यावरून सभापती नायडू यांनी त्यांना समज दिली. या मुद्यावरून राजकीय वादविवाद सुरू असून, आता स्वतः उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी या प्रकरणावर भूमिका मांडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेवरून उदयनराजे यांना समज दिल्यानंतर याचे महाराष्ट्रात पडसाद उटमले होते. राजकीय पक्षांसह सोशल मीडियातूनही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकरणावर आता स्वतः राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करून भूमिका मांडली आहे. “मी स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांचा खंदा प्रशंसक आहे. तसेच देवी भवानीचा उपासक आहे. शपथ घेताना कोणत्याही घोषणा दिल्या जात नाहीत, याची परंपरेनुसार सभासदांना आठवण करून दिली. यात अजिबात अनादर केलेला नाही,” असं व्यंकय्या नायडू यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. उपराष्ट्रपतींनी यावर भूमिका मांडल्यामुळे या वादावर पडदा पडला आहे.

शपथविधी वेळी काय घडलं होतं?

भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इंग्रजीतून शपथ घेतल्यानंतर घोषणा दिल्यामुळे सभापती नायडू यांनी त्यांना समज दिली. शपथ घेतल्यानंतर उदयराजे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणा दिल्या. त्यावर, हे राज्यसभेचे सभागृह नव्हे माझे दालन आहे. दालनात घोषणाबाजी करू नये. सभागृहातही घोषणा देण्याची मुभा नसते. शपथ घेताना घोषणा देऊ नका त्याची नोंद होणार नाही, अशी समज नायडू यांनी उदयनराजे यांना दिली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venkaiah naidu clarification on udayanraje bhosale jay bhawani jay shivaji slogan bmh
First published on: 23-07-2020 at 18:29 IST