नवी दिल्ली : राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी नक्कल केली होती. या प्रकरणाने बुधवारी जातीय वळण घेतले. शेतकऱ्यांचा आणि जाट समाजाचा अपमान केल्याचा पुनरुच्चार धनखड यांनी राज्यसभेत केला. जाट समाजातील व्यक्ती पहिल्यांदाच उपराष्ट्रपती झाली असून तिचा व घटनात्मक पदाचा विरोधकांनी अपमान केला आहे, असे निवेदन केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी वरिष्ठ सभागृहात केले.दरम्यान, धनखड यांना पािठबा देण्यासाठी दिल्लीतील पालम आणि महिपालपूर येथे जाटांच्या खाप पंचायतींनी धरणे आंदोलन केले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी मात्र, प्रक्षोभक विधाने करून लोकांना चिथावणी देणे टाळले पाहिजे, असे खडे बोल सुनावले.

संसदेच्या दोन्ही सदनांमध्ये गोंधळ घातल्याप्रकरणी ‘इंडिया’ महाआघाडीत बहुसंख्य खासदारांना सरकारने निलंबित केले आहे. नव्या संसद भवनातील मकरद्वाराच्या पायऱ्यांवर बसलेल्या विरोधी खासदारांच्या घोळक्यामध्ये उभे राहून तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील निलंबित खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांची नक्कल केली. या घटनेचे काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी चित्रीकरणही केले होते. या संपूर्ण घटनेवर धनखड यांनी राज्यसभेत बुधवारी सकाळच्या सत्रात निषेध व्यक्त केला.

State president of NCP Sharad Pawar faction Jayant Patil criticizes BJP
जयंत पाटील म्हणतात, ‘संविधान बदलण्याचा कट हा ‘त्यांच्या’ ४०० पारच्या घोषणेतून…”
What Amit Shah Said About Uddhav Thackeray And Sharad Pawar?
अमित शाह यांचा प्रहार! “नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस असे अर्धवट..”
Hasan Mushrif On Sanjay Mandalik
“…तर संजय मंडलिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात ईश्वरालाही शक्य होणार नाही”, हसन मुश्रीफ यांचे विधान चर्चेत
Complaint against Fadnavis
फडणवीस व भाजप उमेदवार राम सातपुतेंविरुद्ध आचार संहिता भंग केल्याची तक्रार, मोची समाजाला प्रलोभन दाखविण्याचा आरोप

हेही वाचा >>>‘हिट अँड रन’ची शिक्षा कमी होणार, जामीन मिळण्यातले अडथळे दूर; नवी फौजदारी विधेयके ‘शिक्षे’ऐवजी ‘न्याय’ देणारी?

‘‘माझा कितीही अपमान झाला तरी मी सहन करू शकेन; पण माझ्या पदाचा (उपराष्ट्रपती), शेतकरी समुदायाचा, माझ्या समाजाचा (जाट) अपमान कधीही सहन करणार नाही,’’ असा संताप धनखड यांनी बुधवारी राज्यसभेत व्यक्त केला. ज्यांनी नक्कल करणाऱ्यांचे चित्रीकरण केले आणि नक्कल करणाऱ्याला प्रोत्साहन दिले त्यांच्यावर हेच संस्कार झाले का, असा प्रश्न करत राहुल गांधींना धनखड यांनी लक्ष्य केले. नक्कल प्रकरणावर काँग्रेस तसेच ‘इंडिया’ आघाडीतील अन्य पक्षांच्या नेत्यांनी मौन बाळगल्याबद्दल धनखड यांनी सभागृहामध्ये संताप व्यक्त केला.

 विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि नेते दिग्विजय सिंह यांनी पाळलेल्या मौनाची शांतता कानात घोंघावत असल्याचा उद्वेग धनखड यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या प्रकरणाची दखल घेत   धनखड यांच्याशी संवाद साधल्याची माहिती धनखड यांनी ‘एक्स’वरील संदेशाद्वारे दिली.

जातीवरून लोकांना चिथावणी देऊ नका : खरगे

जातीचा उल्लेख करून धनखडांच्या मतप्रदर्शनावर राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सबुरीचा सल्ला दिला. ‘‘अशा पद्धतीने (प्रक्षोभक) बोलणे योग्य नव्हे. लोकांना चिथावणी देणे टाळले पाहिजे,’’ असे मत खरगेंनी व्यक्त केले. दलित समाजातून आलेल्या खरगेंनी त्यांनाही जातीय अपमान सहन करावा लागल्याचा मुद्दा उपस्थित केला. ‘‘सभापती म्हणतात त्यांचा जातीय अपमान केला गेला, शेतकऱ्यांचा अपमान केला गेला. सभापतींनी सभागृहामध्ये जातीपातीवरून टिप्पणी करणे योग्य नव्हे. मी दलित असल्यामुळे मला राज्यसभेत बोलू दिले जात नाही, असे मी म्हणू लागलो तर योग्य ठरेल का?’’ असे खरगे म्हणाले. 

हेही वाचा >>>देशाच्या विरोधात बोलल्यास शिक्षा, मॉब लिंचिंगला फाशी; तीन फौजदारी सुधारित कायदे लोकसभेत मंजूर

नक्कल ही कला, अपमानाचा हेतू नाही : बॅनर्जी

तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी धनखड यांच्या नकलीचे समर्थन केले. नक्क्ल करणे ही कला असून त्यामध्ये गैर काहीही नाही. नक्कल करून धनखड यांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. धनखड यांचा मी आदर करतो, असे बॅनर्जी यांनी स्पष्ट केले.

कोणी कुणाचा अपमान केला? – राहुल गांधी

कोणी कुणाचा अपमान केला? खासदार पायऱ्यांवर बसलेले होते, मी चित्रीकरण केले आणि ते माझ्या फोनमध्ये आहे. प्रसारमाध्यमे काही भलतेच दाखवत आहेत आणि बोलत आहेत. पंतप्रधान मोदी वारंवार टिप्पणी करत असतात, पण कोणीच काही बोलत नाही, असे प्रत्युत्तर राहुल गांधींनी दिले.

राष्ट्रपतींकडून चिंता

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल करण्यात आल्याच्या प्रकरणावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी चिंता व्यक्त केली.  संसदेच्या संकुलात ज्या पद्धतीने धनखड यांचा ‘अपमान’ करण्यात आला त्याबद्दल आपण निराश झाल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. लोकप्रतिनिधींना अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे, परंतु ते  सौजन्याच्या पातळीवर असले पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.